अयोध्या: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने अंगीकारलेले मवाळ हिंदुत्वाचे (सॉफ्ट हिंदुत्व) धोरण यशस्वी ठरले होते. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले आहे. ते शनिवारी अयोध्येतील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, देशाच्या राजकारणात वरचढ होण्यासाठी आजकाल लोक आपलं गोत्रं आणि जानवं जाहीरपणे दाखवायला लागले आहेत. जे लोक आजपर्यंत आम्ही 'अॅक्सिडेंटल हिंदू' आहोत, असे सांगायचे त्याच लोकांना आता आपण खऱ्या अर्थाने हिंदू असल्याचा साक्षात्कार झाला आहे. हा भारताच्या सनातन श्रद्धेचा विजय आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही काळापासून भाजपच्या नेत्यांकडून देशभरात हिंदुत्वाचा मुद्दा पद्धतशीरपणे तापवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपच्या या खेळीला शह देण्यासाठी काँग्रेसकडून सॉफ्ट हिंदुत्वाचे धोरण अंगीकारले जाताना दिसत आहे. गुजरात आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्यावेळी हे प्रकर्षाने दिसून आले होते. या काळात राहुल गांधी यांनी अनेक मंदिरांना भेटी दिल्या होत्या. तसेच आपण जानवेधारी हिंदू असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. मात्र, काँग्रेसच्या या बदललेल्या रणनीतीला कितपत यश मिळेल, अशी शंका उपस्थित केली जात होती. 



पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देशभरात राम मंदिराचा मुद्दा चांगलाच तापला होता. या मुद्द्यावरून हिंदू मतदारांना साद घालण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी पाच राज्यांमध्ये तब्बल ७४ सभा घेतल्या होत्या. मात्र, उत्तर भारतातील हिंदूबहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राज्यांनी भाजपला नाकारले होते.