योगी आदित्यनाथ अयोध्या दौऱ्यावर
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच अयोध्या दौरा केला.
अयोद्धा : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच अयोध्या दौरा केला. सुरुवातीला रामजन्म भूमी येथील हनुमानगढी आणि नंतर रामलला या ठिकाणी त्यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर शरयू नदी किनारी त्यांनी आचमन करुन घाटाची पहाणी केलीय. दुरुस्तीबाबत त्यांनी काही सुचनाही केल्या.
बनारस प्रमाणे शरयू घाटावर आरती आणि महोत्सवाचं आयोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. १५ वर्षांनंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री अयोध्या दौरा करणार असल्यानं फैजाबाद जिल्हयात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यापूर्वी २००२ मध्ये राजनाथ सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अयोध्येचा दौरा केला होता. त्यानंतर १५ वर्षानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या भागाचा दौरा केला.
बाबरी मशिद खटल्यात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवर मंगळवारी आरोप निश्चित झाल्यावर २४ तासात योगी आदित्यनाथ यांनी अयोद्धा दौरा केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालीये. राम मंदिराचा मुद्दा आमच्यासाठी महत्वाचा आहे. हेच भाजपला यातून दाखवायचय, हाच या भेटीमागे उद्देश असल्याचं बोललं जातंय.