नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारादरम्यान भारतीय लष्कराचा उल्लेख 'मोदी सेना' असा केला होता. यावरून बराच गदारोळ निर्माण झाला होता. निवडणूक आयोगानेही योगींच्या वक्तव्याची दखल घेत त्यांना भारतीय लष्कराबाबत सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी 'एएनआय' वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, योगी आदित्यनाथ यांनी बोलताना चुकून मोदी सेना हा शब्द उच्चारला असेल. मात्र, त्यावरून इतके राजकारण व्हायला नव्हते पाहिजे. आम्ही अशा गोष्टींचे राजकारण करण्याचा विचारही करत नाही, असेही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. 




काही दिवसांपूर्वी गाझियाबाद इथल्या प्रचारसभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांची जीभ घसरली होती.  भारतीय लष्कर हे ‘नरेंद्र मोदी यांची सेना आहे', असे त्यांनी म्हटले होते. यानंतर विरोधकांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर सडकून टीका केली होती. एवढेच नव्हे तर माजी लष्करप्रमुख आणि विद्यमान भाजप खासदार व्ही.के. सिंह यांनीही योगींच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. जर कोणी भारतीय सेना ही मोदींची सेना आहे असं म्हणत असेल तर ते केवळ चुकीचं नाही तर असे म्हणणारा देशद्रोही असल्याचे व्ही.के. सिंह यांनी म्हटले होते. या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात आली. यानंतर निवडणूक आयोगाने गाझियाबाद जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून योगी आदित्यनाथ यांच्या भाषणाची क्लीप आणि त्याचे भाषांतर मागवून घेतले होते.