`महाराष्ट्र सांभाळा, उत्तर प्रदेशची चिंता करु नका`, योगींचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधल्या मंदिरात दोन साधूंची हत्या करण्यात आल्यानंतर राजकारणही तापलं आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधल्या मंदिरात दोन साधूंची हत्या करण्यात आल्यानंतर राजकारणही तापलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 'उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचं राज्य आहे. कायदा तोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाते. बुलंदशहर घटनेनंतर काही तासांमध्येच आरोपींना अटक करण्यात आली. तुम्ही महाराष्ट्र सांभाळा, उत्तर प्रदेशची चिंता करु नका', असं ट्विट योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.
'पालघरमध्ये झालेल्या संतांच्या हत्येबाबत चिंता व्यक्त करण्याला राजकारण म्हणणाऱ्या संजय राऊत यांच्या दृष्टीबद्दल काय बोलणार? तुमचं हे वक्तव्य म्हणजे तुमच्या बदलत्या राजकीय संस्काराची ओळख करुन देत आहे. हे तुष्टीकरणाचं प्रवेशद्वार आहे, यात शंका नाही,' अशी टीकाही आदित्यनाथ यांनी केली आहे.
'संजय राऊत यांना संतांची हत्येवर चिंता व्यक्त करणं राजकारण वाटतं? उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला, कारण पालघरमधले साधू निर्मोही आखाड्याशी संबंधित होते. राजकारण कोण करत आहे?' असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी विचारला आहे.
'बुलंदशहरमधल्या मंदिरात दोन संत साधूंची हत्या झाली आहे. या विषयाचं कोणी पालघरप्रमाणे राजकारण करू नये. देश कोरोनाशी लढत आहे. शांतता राखा. आदित्यनाथ गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील,' असा टोला संजय राऊत यांनी हाणला होता.