गुजरात : गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात एका मंदिरात लाऊडस्पीकरवर जोरात आरती लावण्यात आल्याने एका तरुणाची हत्या करण्यात आली. गुजरातमधील मंदिरांमध्ये लाऊडस्पीकरच्या आवाजामुळे हिंसाचाराची ही दुसरी घटना आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेहसाणा जिल्ह्यातील लंघनाज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जोतना तालुक्यातील लक्ष्मीपुरा गावात ही घटना घडली. मृत जसवंत ठाकोर हे रोजंदारी मजूर होते. जसवंत यांचा मोठा भाऊ अजित ठाकोर यांनी पोलिसांना सांगितले की, दोघेही त्यांच्या घराजवळील मेल्डी माता मंदिरात आरती करत होते. यावेळी लाऊडस्पीकरवर आरती सुरू होती.


त्याचवेळी गावातील सदाजी ठाकोर, विष्णूजी ठाकोर, बाबूजी ठाकोर, जयंतीजी ठाकोर, जवनजी ठाकोर, विनुजी ठाकोर आले आणि मोठ्या आवाजात आरती का लावली याचा जाब विचारला. यावरुन वाद सुरु झाला आणि जसवंत ठाकोर यांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. 


हल्ल्यात जसवंत आणि अजीत गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेतच त्यांना मेहसानातल्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान जसवंत यांचा मृत्यू झाला. अजीत यांच्या तक्रारीनंतर आरोपिंविरोघात गुन्हा दाखल केला. 


याआधी दोन मे रोजी अहमदाबादच्या बावला बावला तालुक्यात 30 वर्षीय भरत राठोड या तरुणालाही मंदिरात लाऊडस्पीकरवर आरती लावल्याच्या कारणाने मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणातही आरोपी आणि पीडित एकाच समाजतील होते.