VIDEO : मित्राच्याच कॅमेऱ्यात कैद झाला तरुणाचा मृत्यू; कर्नाटकातील धक्कादायक घटना
Karnataka Accident : मुसळधार पाऊस पडत असताना एक व्यक्ती घसरून कर्नाटकातील अरसीनागुंडी धबधब्याच्या पाण्यात पडल्यानं मृत्यूमुखी पडली आहे. ही घटना त्या व्यक्तीच्या मित्राने कॅमेऱ्यात कैद केली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार दोघे इंस्टाग्रामसाठी रील काढत होते.
Karnataka News : देशभरात मुसळधार पावसामुळे (Rainfall) जनजीवन कठीण झाले आहे. मुसळधार पावसामुळे अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. कर्नाटकातही (Karnataka News) गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच मुसळधार पाऊस सुरू असताना एक वेदनादायक अपघात समोर आला आहे. कर्नाटकच्या उडपी जिल्ह्यातील अरसीनागुंडी धबधब्यात (Arasinagundi Falls) पाय घसरून पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात रील बनवताना झालेल्या अपघाताचा भीषण व्हिडीओ समोर आला आहे. तरुण धबधब्याजवळ उभा असताना त्याचा व्हिडिओ शूट केला जात होता. त्याचवेळी त्याचा पाय घसरला आणि तो थेट धबधब्यात वाहून गेला. दोन दिवसांपूर्वी हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. बराच वेळ त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न मात्र तो सापडला नाही. पीटीआयच्या वृत्तानुसार या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
रविवारी हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. व्हिडिओमध्ये मृत तरुण धबधब्याच्या काठावर उभा असल्याचे दिसत आहे. तो रील बनवत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो पाण्याच्या प्रवाहात पडला. त्यानंतर जोरदार प्रवाह त्याला वाहून घेऊन गेला. ही घटना मृताच्या मित्राने कॅमेऱ्यात कैद केली जो त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. माध्यमांच्या वृत्तानुसार, दोघेही इन्स्टाग्रामसाठी रील बनवत होते आणि त्याचदरम्यान हा अपघात घडला. त्यानंतर त्या व्यक्तीच्या शोधासाठी बचाव मोहीम सुरू करण्यात आली. मात्र, त्याचा शोध लावण्यात प्रशासनाला यश आलेल नाही. अखेर त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे.
मुंबईत वाहून गेला तरुण
मुंबईतील मालाड पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून बाहेर पडणाऱ्या धबधब्यात 25 वर्षीय तरुणाचा बुडाल्याची घटना समोर आली होती. मद्यधुंद अवस्थेत हा तरुण धबधब्याच्या मध्यभागी जाऊन उभा होता. त्याच्या मित्राने त्याला ओढत बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हात निसटलल्याने मद्यधुंद अवस्थेतील तरुण पाण्याच्या जोरदार प्रवाहासह वाहून गेला आहे. स्थानिकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधाशोध सुरु केली होती. मात्र त्याचा शोध लागला नाही. अखेर दोन दिवसांनी तरुणाचा मृतदेह हाती लागला होता.