YouTuber अगस्त्य चौहानचा मृत्यूच्या काही सेकंद आधीचा व्हिडीओ आला समोर; ताशी 279 KM वेगाने पळवत होता बाईक
Agastya Chauhan Accident: युट्यूबर अगस्त्य चौहान (Youtuber Agastya Chauhan) याचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर पोलिसांना अखेर त्याचा कॅमेरा सापडला आहे. या व्हिडीओत अपघाताच्या काही सेकंद आधी नेमकं काय झालं होतं याचा खुलासा झाला आहे.
Agastya Chauhan Accident: देहरादूनमध्ये वास्तव्यास असणारा अगस्त्य चौहान याचा काही दिवसांपूर्वी अलीगड एक्स्प्रेस-वेवर रस्ते अपघातात मृत्यू झाला. अगस्त्य चौहानच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. तपासादरम्यान, पोलिसांना बरेच प्रयत्न केल्यानंतर अगस्त्य चौहान वापरत असलेला कॅमेरा सापडला आहे. या कॅमेरात अगस्त्य चौहानचे शेवटचे क्षण रेकॉर्ड झाले आहेत. झुडपांमध्ये हा कॅमेरा प़डलेला होता. या व्हिडीओत अगस्त्य चौहान कावासाकीची निंजा बाईक चालवत असल्याचं दिसत आहे. या दुचाकीचा स्पीड ताशी 400 किमी इतका आहे.
अलीगड पोलिसांनी अगस्त्य चौहानच्या फुटलेल्या कॅमेराचा फोटो शेअर केला आहे. तसंच या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेला अगस्त्य चौहानचा दुचाकी चालवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अगस्त्य चौहान तब्बल ताशी 294 किमी वेगाने दुचाकी चालवत असल्याचं दिसत आहे. त्याचा हा वेगात दुचाकी चालवतानाचा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
व्हिडीओत अगस्त्य आपण ताशी 300 किमीचा आकडा पार करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. त्याने एका वेळी गाडी ताशी 279 किमीपर्यंत नेली होती. मित्रांनो रस्ता मोकळा आहे, इथे आपण 300 चा टप्पा गाठू शकतो असं तो बोलताना ऐकू येत आहे. यानंतर तो वेगाने दुचाकी पळवत असून नंतर आपल्याला फक्त हवा जाणवत असल्याचं म्हणत आहे.
दरम्यान अलीगड पोलिसांनी याप्रकरणी नातेवाईकांकडून अद्याप कोणती तक्रार आली नसल्याची माहिती दिली आहे. तसंच तक्रार मिळाल्यास पुढील कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे.
वेगाशी स्पर्धा करण्याचं वेड
एसएसपी कलानिधी नैथानी यांनी या अपघातासंबंधी माहिती देताना सांगितलं की, 3 मे रोजी पोलिसांनी यमुना एक्स्प्रेस-वेवर अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. या घटनेची माहिती घेत तपास केला असता तरुण देहरादूनचा असल्याची माहिती मिळाली. हा तरुण व्हिडीओ ब्लॉगिंग करत असल्याचंही समजलं. तो नेहमी बाईक ताशी 300 च्या वेगाने पळवण्याचं टार्गेट ठेवत असते. हे व्हिडीओ लोक आवडीने पाहतात. त्याने अपघात झाला तेव्हा कॅमेरा लावला होता अशी माहिती मिळाली होती. आम्ही बराच तपास करत हा कॅमेरा मिळवला आहे.
अगस्त्य चौहानने ताशी 279 वेगाने पळवली बाईक
एसएसपी कलानिधी नैथानी यांनी कॅमेऱ्यात अगस्त्य चौहान ताशी 279 किमी वेगाने दुचाकी पळवत असल्याचं दिसत असल्याचं म्हटलं आहे. अपघाताच्या काही सेकंद आधी कॅमेऱ्यात हा व्हिडीओ रेकॉर्ड झाला होता. आम्ही याप्रकरणी अधिक तपास करत आहोत असंही त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान यानिमित्ताने त्यांनी तरुणांना दुचाकी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवण्याचं आवाहन केलं आहे. तरुण अनेकदा जीव धोक्यात टाकत वेगाने दुचाकी चालवत असतात. हायवेवर लोक अनेकदा आपल्या कुटुंबासह प्रवास करत असतात. यावेळी त्यांच्यासोबत लहान मुलं, महिला. वयस्कर लोकदेखील असतात. अशाप्रकारे वेगात गाडी चालवल्याने त्यांनाही त्रास होतो असं ते म्हणाले आहेत.