नवी दिल्ली - गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देशभरात संताप व्यक्त करण्यात आला. दहशतवादी आणि त्याचे पाठिराखे यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आता देशात सर्व स्तरातून पुढे येऊ लागली आहे. या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर भारताने दिलेच पाहिजे, अशी मागणी देशवासियांकडून केली जाऊ लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरातील नागरिक मंगळवारी, १९ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता दोन मिनिटे शांतता पाळणार आहेत. वीर योद्ध्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व नागरिकांनी आपल्या जागेवर दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन 'झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड'ने सर्व नागरिकांना केले आहे. अटीतटीच्या प्रसंगातही देशबांधव एकत्रपणे मुकाबला करण्यासाठी सिद्ध आहेत, हेच यातून दाखविण्यात येईल. त्याचबरोबर या माध्यमातून देशातील सर्व नागरिक सरकारच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत, हे सुद्धा दाखवून देण्यात येईल. सरकारने दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची मागणीही यानिमित्ताने करण्यात येत आहे.


पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना 'जैश ए मोहम्मद'च्या एका दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेली चारचाकी गाडी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यातील एका बसला धडकावून घडवून आणलेल्या स्फोटात ४० जवानांना प्राणांना मुकावे लागले. एकूण ७८ बसमधून २५४७ जवान जम्मूकडून श्रीनगरकडे जात असताना हा स्फोट घडवून आणण्यात आला.


स्फोटकांनी भरलेल्या गाडीने बस उडवून देण्यात आल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये नौशेरा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी भूसुरूंग स्फोट घडवून आणला. ज्यामध्ये मेजर चित्रेश सिंग बिष्त शहीद झाले. त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा दहशतवादी आणि सुरक्षारक्षक यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत गेल्या गुरुवारी पुलवामामध्ये घडवून आणलेल्या आत्मघाती स्फोटाचा सूत्रधार कामरान आणि गाझी हे दोघेही मारले गेल्याची माहिती पुढे आली आहे. हे दोघेही 'जैश ए मोहम्मद' या संघटनेचे दहशतवादी होते. दरम्यान या चकमकीत भारताचे आणखी चार जवान शहीद झाले आहेत. 


काश्मीर खोऱ्यात गेल्या गुरुवारपासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आतापर्यंत एकूण ४५ जवानांना आपल्या प्राणांना मुकावे लागले. जवानांच्या अश्रूंचा एक थेंबही वाया जाऊ देणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या जवानांना दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी पूर्ण सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानला देण्यात आलेल्या 'मोस्ट फेवर्ड' राष्ट्राचा दर्जाही काढून घेण्यात आला आहे.