नवी दिल्ली: 'झी न्यूज'वर निराधार आरोप आणि बदनामी केल्याबद्दल शनिवारी काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना वृत्तवाहिनीकडून अब्रुनुकसानीची नोटीस पाठवण्यात आली. 'झी न्यूज'चे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. सिद्धू यांनी झी मीडियाविरोधात निराधार आणि बदनामी करणारे आरोप केले होते. यासाठी त्यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. यानंतरही त्यांनी 'झी न्यूज'ची माफी न मागितल्यास सिद्धू यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे चौधरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते आहे - सुधीर चौधरी



नुकत्याच झालेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीवेळी अलवार येथे सिद्धू यांची प्रचारसभा झाली होती. या सभेत काही जणांनी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्याचा प्रकार 'झी न्यूज'ने समोर आणला होता. मात्र, सिद्धू यांनी उलट 'झी न्यूज'ने दिशाभूल करणारा व्हीडिओ प्रसारित केल्याचा आरोप केला होता. एवढेच नव्हे तर त्यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर करत 'झी न्यूज'ला धमकीही दिली. याशिवाय, त्यांनी 'झी न्यूज' विरोधात बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशाराही दिला होता.


'पाकिस्तान झिंदाबाद' घोषणा : 'झी न्यूज'ची सिद्धूविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार



यानंतर 'झी न्यूज'ने  नवज्योत सिंग सिद्धू आणि पक्षाच्या इतर नेत्यांविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. निवडणुकीच्या काळात भारतविरोधी शक्तींकडून पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात यावी आणि काँग्रेस पक्षातील दोषींविरुद्ध कडक कारवाई करावी, असे सुद्धा तक्रारीत म्हटले होते. यावेळी 'झी न्यूज'ने निवडणूक आयोगाकडे प्रत्यक्षदर्शींनी चित्रित केलेल्या व्हिडिओंचे फुटेज असलेल्या सीडी सुपूर्द केल्या होत्या. 



दरम्यान, 'झी न्यूज'ने 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देतानाचा व्हीडिओ प्रसारित केल्यानंतर काँग्रेसकडूनही एक व्हीडिओ जारी करण्यात आला होता. मात्र, या व्हीडिओमधून 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देतानाची दृश्ये वगळण्यात आली होती. विशेष म्हणजे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनीही या वृत्ताची दखल घेतली होती.