Zomato Veg Food Green Fleet : मागील काही वर्षांमध्ये ऑनलाईन खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या अनेक कंपन्या, अनेक अॅप चर्चेचा विषय ठरले. कमालीच्या ऑफर, त्यातून होणारा फायदा आणि अर्थातच सरतेशेवटी मिळणारं चवीष्ट जेवण किंवा खाद्यपदार्थ असं हे एकंदर समीकरण. Food Delivery चा विषय जेव्हाजेव्हा निघतो तेव्हातेव्हा झोमॅटोचाही उल्लेख होतोच. शाकाराही, मांसाहारी, जैन, किटो, डाएट अशा शक्य त्या सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांना तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या अॅपनं नेहमीच युजरना केंद्रस्थानी ठेवत काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. असाच एक निर्णय कंपनीनं काही दिवसांपूर्वी घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाकाहारी पदार्थांच्या डिलिव्हरीसाठी कंपनीनं 'ग्रीन फ्लीट'सुरु केलं होतं. जिथं हे जेवण ने- आण करणारी मंडळी वेगळी असून त्यांच्या कपड्यांचे रंगही लाल ऐवजी हिरवे असतील असं सांगत कंपनीनं  हा बदल लागू केला. थोडक्यात शाकाहारी पदार्थ खाणाऱ्यांसाठी झोमॅटोनं  'प्योर वेज मोड' (Pure Veg Mode) लाँच केला. ज्याअंतर्गत हे पदार्थ ने- आण करणारे डबेही हिरव्याच रंगांचे दिसले. पण, या रंगाचा विरोध करणाऱ्यांचीच संख्या जास्त असल्याचं पाहायला मिळालं. 


Zomato चे  सीईओ दीपिंद्र गोयल यांनी X च्या माध्यमातून माहिती देत यासंदर्भातील एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली. भारतामध्ये शाकाहार करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शिवाय ग्राहकांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते जेवण बनवण्याची आणि ते हाताळण्याची पद्धत याबाबत बरेच संवेदशनशील असल्याचं म्हणत हा नवा उपक्रम टप्प्याटप्प्यानं लागू केला जात असल्याचे संकेत त्यांनी दिले.  


झोमॅटोच्या या उपक्रमाला अपेक्षित प्रतिसाद मात्र मिळाला नाही. कोणी याला भेदभावपूर्ण निर्णय म्हटलं तर कोणी, आमच्या सोसायटीमध्ये आता लाल रंगांच्या कपड्यांमधील डिलिव्हरी बॉयला प्रवेश दिला जाणार नाही अशी चिंता व्यक्त केली. काहींनी तर यामुळं अॅपही डिलीट केलं. ज्यानंतर आता इथं कोणत्याही धर्म किंवा पंथाचा वाद नसल्याचं स्पष्ट करत झोमॅटोच्या सीईओंनी कंपनीनं हा निर्णय मागे घेतल्याचं सांगितलं. 



हेसुद्धा वाचा : विराट इथे पण अनुष्का कुठे? 'विरुष्का' सहकुटुंब परदेशात स्थायिक होण्याच्या तयारीत, देशही निवडला? 


थोडक्यात आता शाकाहारी जेवण पोहोचवणारी मंडळी हिरवे नव्हे, तर लाल रंगाचेच कपडे परिधान करणार आहेत. दरम्यान, Zomato सध्या अशाच प्रकारच्या खास प्लीटवर काम करत असून, त्यामध्ये केकसाठीही एक खास फ्लीट पाहायला मिळत आहे. जिथं कंपनीकडून हायड्रॉलिक बॅलेन्सरचा वापर केला जाणार आहे. ज्यामुळं केक डिलिव्हरीच्या वेळी तो जसाच्या तसा राहणार असून, त्याचं नुकसान होणार नाही.