Zomato Q1 Result : ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने (Zomato) जूनच्या तिमाहीत 2 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. झोमॅटोने मिळवलेल्या या नफ्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु झाली आहे. कंपनीने पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात नफा मिळवल्याने जोरदार चर्चा सुरु आहे. झोमॅटोला एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 186 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तर त्यांची कमाई 1,414 कोटी रुपये होती. तर यावर्षी झोमॅटोचा जून तिमाहीत महसूलही वार्षिक 70.9 टक्क्यांनी वाढून 2,416 कोटी रुपये झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झोमॅटोने गुरुवारी, 3 ऑगस्ट रोजी जून तिमाहीचे निकाल जाहीर करताना ही माहिती दिली. कंपनीने सांगितले की, महागाईत घट आणि त्याच्या लॉयल्टी कार्यक्रमातील फायद्यांसह मागणीत झालेली वाढ यामुळे जून तिमाहीत त्यांचा महसूल वाढण्यास मदत झाली. झोमॅटोने  प्रथमच नफा नोंदवला आहे. कंपनीचा निव्वळ नफा दोन कोटी रुपये इतका झाला आहे.


सोशल मीडियावर उडवली खिल्ली


झोमॅटोने नफा जाहीर केल्यानंतर कंपनी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. अनेक ट्विटर युजर्संनी कंपनीच्या पहिल्या नफ्याबद्दल संस्थापक दीपंदर गोयल यांचे अभिनंदन केले आहे. तर अनेकांनी त्याला टोमणा मारला आहे. मात्र हे सर्व झोमॅटोचे संस्थापक दीपंदर गोयल यांनी सकारात्मक पद्धतीने घेतले आहे. दुसरीकडे वीरेंद्र हेगडे नावाच्या ट्विटर युजरने दिलेली प्रतिक्रिया जोरदार व्हायरल होत आहे. 'भाऊ माझ्याकडून 2 कोटी घेतले असते. त्यासाठी घरोघरी अन्न पोहोचवण्याची काय गरज होती,' असे वीरेंद्र हेगडे याने म्हटलं आहे. या ट्विटला प्रतिक्रिया देताना दीपंदर गोयल यांनी  'Tweet of the day. ROFL!'असं म्हटलं आहे.



दरम्यान, पेटीएमचे सीईओ, विजय शेखर शर्मा यांनी या यशाबद्दल झोमॅटो टीमचे अभिनंदन केले आहे. यासोबत गोयल यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री, राजीव चंद्रशेखर यांनीही झोमॅटोला सर्व गुंतवणूकदार आणि स्टार्टअपसाठी उज्ज्वल भविष्य म्हटलं आहे. त्यांच्या ट्विटला उत्तर देताना दीपंदर गोयल यांनी, "खूप खूप धन्यवाद सर... आमच्या देशाच्या सेवेत झोमॅटोची उभारणी सुरू ठेवल्याचा आम्हाला अभिमान आहे," असे म्हटलं आहे.


"आम्हाला आशा आहे की येणाऱ्या आमचा व्यवसाय फायदेशीर राहिल आणि आज आपल्याला जे माहीत आहे ते पाहता, आम्हाला खात्री आहे की आम्ही आमच्या महसुलात 40 टक्क्यांहून अधिक वार्षिक वाढ सुरू ठेवू," असे झोमॅटोचे मुख्य वित्तीय अधिकारी अक्षत गोयल यांनी सांगितले.