IPL 2023 : पहिल्यांदाच कॅप्टन्सी करणं सूर्याला पडलं माहागात, `त्या` कृत्यामुळे भरावा लागणार दंड
MI vs KKR : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यातील सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला. मात्र या सामन्यात पहिल्यांदाच कॅप्टन्सी मिळालेल्या सुर्यकुमार यादवला 12 लाखांचा दंड ठोठवण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया....
Suryakumar Yadav : आयपीएल 2023 च्या 22 वा सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात काल (16 एप्रिल 2023) वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात 5 वेळा चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 5 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा हा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला. तर दुसरीकडे पहिल्यांदाच कर्णधार पदाची कमान सांभाळताना सुर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स (MI) केकेआरविरुद्ध विजय मिळवला. तरीही कर्णधार सुर्यकुमारला लाखोंचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या दोन्ही संघातील तीन खेळाडूंना सामन्याच्या नियमांबाबत लाखोंचा दंड ठोठावण्यात आला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणा आणि मुंबई इंडियन्सचा गोलंदाज हृतिक शोकीन यांना रविवारच्या (16 एप्रिल 2023) सामन्यात आयपीएल आचारसंहिता मोडल्याबद्दल लाखोंचा दंड भरावा लागणार आहे. त्याचवेळी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या सूर्यकुमार यादवलाही 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएल 2023 सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्स संघाचा गोलंदाज शोकिनने केकेआरच्या नितीश राणाला बाद केल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. यानंतर दोन्ही खेळाडूंनी भरमैदानात बाचाबाची सुरू केली. यामुळे आयपीएलकडून या दोघांवर लाखोंचा दंड ठोठवावा लागला. यावेळी आयपीएलने म्हटले आहे की, "मुंबई इंडियन्सचा आयपीएल आचारसंहितेचा पहिला गुन्हा असल्याने कर्णधार सूर्यकुमार यादवला स्लो ओव्हर रेटच्या गुन्ह्यासाठी 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे."
नितीश-शौकीनवर लाखांचा दंड
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाला आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. नितीश राणा यांनी आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.21 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा कबूल केला आहे. तर मुंबई इंडियन्सचा गोलंदाज हृतिक शोकीनला त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. शोकीनने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.25 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा कबूल केला आहे.
मुंबई इंडियन्सचा विजय
आयपीएल 2023 च्या 22 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 5 गडी राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 20 षटकात 185 धावा केल्या. त्याच वेळी, एमआयने हे लक्ष्य 17.4 षटकांत सहज गाठले. मुंबई इंडियन्सने हा सामना 14 चेंडू बाकी असताना 5 गडी राखून जिंकला.