कोकण दौरा लांबणीवर टाकणाऱ्या आदित्य ठाकरेंना आशिष शेलारांचा टोला
आशिष शेलार आणि नितेश राणे यांनी शनिवारी कोकणातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.
सिंधुदुर्ग: मुंबईच्या वरळी मतदारसंघातून निवडून आलेल्या आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर कोकणात क्यार या चक्रीवादामुळे हातातोंडाशी आलेले शेतातील पीक पार झोपले होते. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार आहे. यापूर्वी आदित्य यांचा कोकण दौरा दोनदा रद्द झाला होता. या विलंबावरून आशिष शेलार यांनी आदित्य यांना टोला लगावला. आशिष शेलार हे सध्या सिंधुदुर्गात शेतकऱ्यांच्या नुकसान पाहणी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत नारायण राणे यांचे सुपूत्र आणि कणकवलीचे आमदार नितेश राणेही उपस्थित होते.
यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आशिष शेलार यांनी अप्रत्यक्षपणे आदित्य यांच्यावर शरसंधान साधले. आमच्यासाठी 'पहिला शेतकरी मग सरकार' अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली. यापूर्वीही शेलार यांनी शिवसेनेवर अनेकदा जाहीर टीका केली होती. त्यामुळे आता शिवसेनेकडून याला कशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज कोकणाच्या दिशेने रवाना होतील. कोकणात अवकाळी पाऊस आणि क्यार चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भात शेतीबरोबरच मच्छिमारांनाही याचा मोठा फटका बसला होता. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना आदित्य ठाकरे आज भेट देतील.
शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी १० हजार कोटींची मदत
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडून १० हजार कोटींची तरतूद करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. नुकसानीचे पंचनामे तातडीने केले जातील, वेळेत पंचनामे न झाल्यास नुकसानीचे फोटोही ग्राह्य धरले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.