प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाचा संसर्ग कमी न झाल्यामुळे पुन्हा १९ दिवसांचा लॉकडाऊन घेतला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे मुंबईत आहेत. मुंबईत कोकणातील अनेक चाकरमाने काम करतात. मात्र, आता लॉकडाऊनमुळे ते तिथेच अडकले आहेत. देशातील महामार्गावरील जिल्हाअंतर्गत सीमाही बंद करून येथे कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने वाहतूकीचे सर्वच मार्ग बंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी मुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांना गावी जाण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून लोक रोजीरोटीच्या निमित्ताने गेलेले आहेत. त्यांच्यात कोकणातील लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. माझ्या कोकणातील रोजीरोटी निमित्त मुंबई गेलेले चाकरमानी कोकणात परत येण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी असे जाधव म्हणाले आहेत.


मुंबईमधली आजची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीपासूनच मी सांगत आलोय. कोकणातील लोकांना कोकणामध्ये येउ द्या. तीथे गावामध्ये त्यांची घरे आहेत. त्यांना मोकळा श्वास घेता येइल. अजूनही वेळ गेलेली नाही, अशी विनंती भास्कर जाधव यांनी केली.



'रत्नागिरीकरांची जबाबदारी वाढली'


रत्नागिरी जिल्हा कोरोना मुक्त झाला तरी आता आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या नियमांचे कोणीही उल्लंघन करु नये. रत्नागिरीकरांनी आतापर्यंत जसे सहकार्य केले तसेच सहकार्य ३ मेपर्यंत करावे, असे आवाहन उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. सहा महिन्याच्या बाळाचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आता आपली जबाबदारी वाढली, असे सामंत म्हणालेत. 


जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. मात्र, दुबईतून गुहागर येथील शृंगारतळी येथे आलेल्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली होती. हा पहिला रुग्ण होता. या रुग्णावर उपचार करण्यात आले. हा पहिला रुग्ण आता बरा होऊन घरी गेला आहे. आता सहा महिन्यांचे बाळ बरे झाले आहे. त्यामुळे ही आपल्या जिल्ह्यासाठी एक चांगली बाब आहे. आपला जिल्हा कोरोना मुक्त झाला ही बाब चांगली असली तरी घबरदारी घ्यायला पाहिजे. आजही काही जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांनीही घबरदारी घेण्याची गरज आहे, असे सामंत यांनी म्हटले आहे.