MHADA Lottery : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या  (MHADA Konkan Division Houses Lottery) ठाणे शहर आणि ठाणे जिल्हा, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग येथील 5311 सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरु झाली आहे. ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला 15 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. मात्र या सोडतीसाठी लोकांचा अल्प प्रतिसाद येत असल्याचे समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत तयार केलेल्या 5311 घरांसाठी 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात भरलेल्या अर्जांची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच यासाठी ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. म्हाडाची घरं म्हटलं की इतर विकासकांच्या मानाने कमी दरात मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे हे घर मिळवसाठी सामान्य माणूस प्रयत्न करत असतो. मात्र यंदा काढण्यात आलेल्या लॉटरीला कमी प्रतिसाद मिळताना दिसत आहे.


म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 5311 घरांच्या विक्रीसाठी ऑनलाईन सोडतीसाठी अर्जाची नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला 15 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. मात्र सात दिवसात केवळ 2 हजार 502 अर्जदारांनीच या घरांसाठी अर्ज केले आहेत. तर 904 अर्जदारांनीचा अनामत रक्कम भरली आहे. त्यामुळे या सोडतीला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.


अडचणींचाही करावा लागतोय सामना


ऑनलाईन सोडतीसाठी अर्जाची नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत लोकांना अडचणींचा देखील सामना करावा लागत आहे. एका नावाने अर्ज भरताना पॅन नंबर व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवले जात आहे. दुसरे युझर नेम वापरले तर बॅंक अकाउंट व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत आहे. संगणकावर दोन-तीन युजर नेम टाकूनही अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत, अशा अडचणींचा सामना लोकांना करावा लागत आहे. मात्र मोबाइल ॲपद्वारे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला काहीसा वेग असल्याचे पाहायला मिळत आहे. 


दरम्यान, 16 ऑक्टोबर, 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत नागरिकांना म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर 18 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 11. 59 पर्यंत अर्जदार ऑनलाईन अनामत रक्कम भरु शकणार आहेत. त्यानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदाराच पात्र ठरवले जाणार आहेत. सोडतीसाठी पात्र अर्जदारांच्या अर्जाची अंतिम यादी दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर 7 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार आहे.


म्हाडा सोडतीसाठी आवश्यक कागदपत्रे


म्हाडा लॉटरी 2023 साठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे ही सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.


आधार कार्ड
पॅन कार्ड
अधिवास प्रमाणपत्र
शाळा सोडल्याचा दाखला
चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)
मतदार ओळखपत्र
पासपोर्ट
जन्म प्रमाणपत्र