`बरळत रा(ह)णे तुमचं काम आहे, जीभ ताब्यात ठेवा शिवसैनिक ठाम आहे`, शिवसेनेचं नवं पोस्टर
नारायण राणे - शिवसेना वाद कायम, नव्या पोस्टरची चर्चा
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद काही शमण्याच नाव घेत नाही. नारायण राणे यांचा जामीन मंजूर झाला असला तरीही त्यांना 2 सप्टेंबर रोजी नाशिक पोलीस आयुक्तालयात हजर रहावे लागणार आहे. आजही नारायण राणे - शिवसेना यांच्यात वाद सुरूच आहे. ठाण्यात आज ठिकठिकाणी राणेंवर झालेल्या कारवाईंच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी पोस्टर लावले आहेत.
ठाण्यात उ्ड्डाणपुलांवर हे पोस्टर झळकत आहेत. यावर लिहिलं आहे की,'बरळत रा(ह)णे तुमचं काम आहे. जीभ ताब्यात ठेवा शिवसैनिक ठाम आहे.. आज, उद्या, कधीही... मा. उध्दवजींसोबतच...' असा आशय त्या पोस्टरवर छापण्यात आला आहे. या पोस्टरवर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची नावे आहेत. या दोन्ही नेत्यांकडून हे पोस्टर ठाण्यातील उड्डाणपुलांवर लावण्यात आले आहेत.
नाशिक पोलिसांकडून राणे यांना नोटीस बजवण्यात आली आहे. 2 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी नारायण राणे यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आजच सुनावणीची शक्यता आहे. (Notice to Narayan Rane from Nashik Police)
राणे यांना अटक करणे हा हेतू नाही फक्त वक्तव्याची पुनरावृत्ती होऊ नये ही अपेक्षा. त्यांना नोटीस बाजावण्याची कारवाई झालेली आहे. त्यांनी बॉण्ड लिहून दिलेला आहे ते अपेक्षित होते. आमच्या केसमध्ये 2 तारखेला येण्याचे समन्स दिले आहेत. त्यांनी त्याचा स्वीकार केला आहे, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिली. ते म्हणाले अटकेच्या आदेशात बदल करण्यात आले आहेत आणि केवळ नोटीस बाजवण्यात आली आहे. भारताच्या संविधानात राष्ट्रपती आणि राज्यपाल सोडून कुणी व्यक्ती कितीही मोठा असेल त्याला अटक केली जाऊ शकते, मी रुल ऑफ लॉ फॉलो करतो, असे नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणाले.