नितेश राणे चक्क संघाच्या कार्यक्रमाला; राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या
नितेश राणे भाजपच्या संस्कृतीशी जुळवून घेताना दिसत आहेत.
देवगड: नारायण राणे यांचे सुपूत्र आणि नवे भाजपवासी नितेश राणे यांच्या एका कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच नितेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आज त्यांनी चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीनिमित्त होणाऱ्या मेळाव्याला हजेरी लावली. देवगडच्या जमसंड येथे दरवर्षी संघाकडून विजयादशमीनिमित्त संचलन केले जाते. मात्र, यावेळी कार्यक्रमातील नितेश राणे यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
एरवी नितेश राणे आपल्या रोखठोक आणि धडाडीच्या स्वभावासाठी ओळखले जातात. मात्र, ते मंगळवारी चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांबरोबर मांडी घालून जमिनीवर बसल्याचे दिसून आले. साहजिकच हे पाहून राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वी नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षातील संस्कृती तेवढीशी मानवली नव्हती. मात्र, नितेश राणे यांनी कालाय तस्मै नम: म्हणत स्वत:मध्ये बदल केल्याचे दिसत आहे. या कार्यक्रमाला नितेश यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हेदेखील उपस्थित होते.
आमदार नितेश राणेंसह समर्थकांनी महामार्ग अभियंत्यावर ओतला चिखल
दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नितेश राणे कणकवली मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. मात्र, शिवसेनेने त्यांच्या उमेदवारीला आक्षेप घेत सतीश सावंत यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे.
नारायण राणे यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी सहकुटुंब भाजपमध्ये प्रवेश करायचा होता. मात्र, शिवसेनेच्या कडव्या विरोधामुळे नितेश यांना मागच्या दाराने पक्षात प्रवेश देण्यात आला होता. यानंतर नितेश भाजपची संस्कृती समजावून घेताना दिसत आहेत.