व्हॉटसअॅप ग्रुपमुळे वृद्ध दाम्पत्याला पुन्हा मिळाला निवारा
वृद्ध दाम्पत्याला त्यांचे पडलेले घर बांधून देण्यात आले.
रत्नागिरी: रत्नागिरीतल्या हरचेरी येथील एका निराधार वृद्ध दाम्पत्याला सोशल मीडियाच्या मदतीमुळे हक्काचे छप्पर मिळाले. रत्नागिरी मदत ग्रुपने व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून या दाम्पत्याच्या घरासाठी निधी जमा केला. त्याला दानशूर मंडळींनी चांगला प्रतिसाद दिला. या मदतीमुळे या वृद्ध दाम्पत्याला त्यांचे पडलेले घर बांधून देण्यात आले.
रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी गावातील काशीनाथ नाचणकर ( वय 78 ) आणि व त्यांची पत्नी सुनंदा काशीनाथ नाचणकर ( वय 72 ) या वयस्कर दाम्पत्याच्या घराची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्यातच काशिनाथ नाचणकर हे अर्धांगवायू आजाराने त्रस्त आहेत.
या दाम्पत्याला मुलबाळ नाही. अशातच त्यांच्या राहत्या जुन्या घराच्या भिंती पावसात कोसळत चालल्या होत्या. त्यामुळे या दाम्पत्याला तातडीने घर बांधून देण्यासाठी पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तींनी एकूण 20 हजाराची मदत जमा केली. त्यात अजून पैशांची आवश्यकता होती. दरम्यान 'रत्नागिरी मदत ग्रुप'ला हि घटना समजताच ग्रुपचे अध्यक्ष शुभम कीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काशीनाथ नाचणकर यांची घरी जाऊन भेट घेतली. त्यांची आस्थेने चौकशी करत तुमचं घर बांधून देऊ असा शब्द दिला. त्यानंतर रत्नागिरी मदत ग्रुपने समाजातील दानशूर व्यक्तींनी या वृद्ध दाम्पत्यावर मायेचे छप्पर घालावे असे आवाहन व्हॉट्सअँप व फेसबुकच्या माध्यमातून केले.
या आवाहनाला समाजातील दानशूर व्यक्तींनी खूप चांगला प्रतिसाद दिला. काहींनी रोख रक्कम तर काहींनी वस्तू रुपात मदत केली. तर जे काही आणखी पैसे कमी पडले ते ग्रुपच्या सदस्यांनी टाकले. त्यामुळे नाचणकर दाम्पत्याचे घर पुन्हा उभे राहिले.