सिंधुदुर्ग: यंदा कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या  चाकरमान्यांना कोणीही मज्जाव करणार नाही आणि आम्ही करू देणार नाही, असे वक्तव्य शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केले. ते शुक्रवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने आचारसंहिता तयार करावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच भारतीय वैद्यक संशोधन संस्थेने ICMR कोकणातील चाकरमन्यांसाठी क्वारंटाईन कालावधी सात दिवसांचा करावा, असेही राऊत यांनी म्हटले. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच राज्य सरकारने कोकणात येण्यापूर्वी चाकरमन्यांची कोरोना टेस्ट माफक दरात करावी. चाकरमान्यांना जिल्हा बंदी करण्याची कोणतेही आदेश प्रशासनाला देण्यात आलेले नाहीत. कोणीही या सगळ्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये, असेही राऊत यांनी सांगितले. 

यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने भजन, आरती मोठ्याप्रमाणात होणे योग्य नाही. माझ्याच घरी दरवर्षी २१५ भजनं होतात. परंतु, यंदा भजन न करता घरी राहून आरत्या करा, अशी विनंती भजनी मंडळांना केल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.


गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जिल्हाबंदी करणार असल्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. कोकणात यायला कोकणी माणसाला बंदी, असं होऊ शकत नाही. असा आदेश निघाला नाही, पण जर बंदी आदेश आला तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे. घरी जाण्यासाठी ई-पास कशाला हवा? असा सवालही राणे यांनी उपस्थित केला. सिंधुदुर्गात कोरोना मुंबईकरांमुळे पसरला, असेही नारायण राणे यांनी म्हटले होते.