धक्कादायक! मुसळधार पावसामुळे काढावी लागली रिक्षावरून अंत्ययात्रा
मुसळधार पावसामुळे नालासोपाऱ्यातील सर्व यंत्रणा ठप्प झाल्या असतानाचा हा व्हिडीओ आहे.
वसई: काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे वसई आणि नालासोपारा या शहरांना पाण्याचा वेढा पडला होता. त्यामुळे या शहरांचा उर्वरित जगाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला होता. पाऊस थांबल्यानंतर परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर आता पावसाच्या दाहकतेच्या घटना एकएक करून समोर येत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे एका धक्कादायक घटनेचा उलगडा झाला आहे.
मुसळधार पावसामुळे नालासोपाऱ्यातील सर्व यंत्रणा ठप्प झाल्या असतानाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत एका रिक्षावरून एका व्यक्तीची अंत्ययात्रा जात असल्याचे दिसत आहे.
नालासोपाऱ्यात मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचलं होतं. त्यामुळे एका व्यक्तीचे पार्थिव रिक्षावरुन नेण्याची वेळ आली. दुर्दैव म्हणजे पाणी भरल्याने ही रिक्षाही बंद पडली. त्यामुळे अंत्ययात्रेतील लोक या रिक्षेला धक्का मारत नेत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ नालासोपारा पश्चिम इथल्या पांचाळ नगर विभागातील असल्याचं सांगण्यात येतंय. या व्हिडीओमुळे सज्जतेचे दावे करणाऱ्या प्रशासनाच्या नियोजन आणि आपत्कालीन यंत्रणेचे धिंडवडे निघाले आहेत.