वसई: रेल्वेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे प्लग काढून, चक्क मोबाईल चार्ज करणाऱ्या १७ जणांवर रेल्वेच्या लोहमार्ग पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. ९ जुलै ते ११ जुलै पावसाच्या प्रलयामुळे वसई विरार मधील संपूर्ण जनजीवनच ठप्प होते. त्यामध्ये ३० तास वीज गायब होती. त्यामुळे अनेकांचे मोबाईल चार्ज करण्याचे वांदे झाले होते. आपल्या नातेवाईकांशी संपर्कही होत नव्हता त्यामुळे काही पठ्ठ्यांनी चक्क वसई रेल्वे स्टेशनच्या सीसीटीव्ही कॅमे-याचे प्लग काढून आपले मोबाईल चार्ज केले. 


आर.पी.एफ.ने सीसीटीव्हीचे स्क्रीन बंद असल्याचे बघितल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.  त्यानंतर चौकशी केल्यावर मोबाईल चार्जिंगसाठी सीसीटीव्हीचा प्लग काढल्याचे चित्र स्पष्ट झाले. या प्रकरणी ११ जुलैला सतरा मोबाईल चार्ज करणाऱ्या व्य़क्तींवर कारवाई करण्यात आली. रेल्वे सुविधेवर बाधा पोहचवणे, छेडाछाड करणे रेल्वे अधिनियम १४५ बी आणि सी लावण्यात आले. त्यांच्याकडून २०० रुपये  दंड आकारण्यात आला. याबाबत अधिक बोलण्यास आर.पी.एफ. ने नकार दिला आहे.