मुंबई - भाजपच्या एबी फॉर्मच्या साह्याने राज्यसभेतील खासदार झालेल्या नारायण राणे यांची तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली आहे. भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोजिनी पांडे यांच्याकडे आपण ही मागणी केली असल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारायण राणे भाजपच्या एबी फॉर्मवर खासदार झाले आहेत. तरीही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात. अच्छे दिनच्या घोषणेची टिंगलटवाळी करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करतात. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला जावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी प्रमोद जठार यांनी केली. पनवेलमध्ये झालेल्या पक्षाच्या विभागीय बैठकीत सरोजिनी पांडे यांच्याकडे आपण तशी मागणी केली असल्याचे प्रमोद जठार यांनी 'झी २४ तास'ला सांगितले. 


आगामी लोकसभा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विषय आणखी तापण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचे पडसाद उमटू शकतात. राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.