रत्नागिरी: नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे, अशी झोंबणारी टीका राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली. ते शुक्रवारी रत्नागिरी येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली. या राणेंनी आतापर्यंत किती पक्ष बदलले. शिवसेना सोडल्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. आता भाजपमध्ये आलेत. त्यांच्यासाठी आता फक्त रामदास आठवलेंचा पक्ष बाकी राहिलाय, असे त्यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच नारायण राणे बघावं तेव्हा मातोश्रीवर टीका करतात. मात्र, आपली तेवढी औकात आहे का, हे त्यांनी तपासून बघावं. याच शिवसेनेच्या जोरावर नारायण राणे आणि त्यांच्या मुलाबाळांनी कोट्यवधींची संपत्ती कमावली. त्यामुळे मातोश्रीवर बोलण्याची त्यांची औकात आहे का? नारायण राणेंसारख्या व्यक्तीला 'सूर्याजी पिसाळची अवलाद' ही उपमादेखील कमी पडेल, असा झोंबणारा टोला कदम यांनी लगावला. नारायण राणे हा कोकणाला लागलेला काळा डाग असल्याचेही त्यांनी म्हटले. हा डाग मी धुतल्याशिवाय राहणार नाही, अशी गर्जनाही कदम यांनी केली.


नारायण राणे यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर राणे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकण असे दौरे केले होते. यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढायचे झाल्यास कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी राणे यांना ताकद पुरवण्याची भाजपची रणनीती आहे.


दरम्यान, मध्यंतरी राणे यांनी भाजपचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नाणारला विरोध केला होता. आपला याआधी नाणार प्रकल्पाला विरोध होता आणि यापुढेही राहील. नाणार प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही, वेळ पडल्यास फक्त शिवसेनेप्रमाणे धमकी देणार नाही तर खासदारकीचा राजीनामा देईन, असा इशारा राणेंनी दिला होता.