रत्नागिरी: एसटी विभागात मोठा गाजावाजा करत आणलेल्या शिवशाही बसवर सध्या जप्तीची नामुष्की ओढावली आहे. ज्या कंपनीच्या मालकीच्या या बस आहेत त्या कंपनीने काही शिवशाही बसचे हप्तेच न भरल्यामुळे दहा बसची जप्ती करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. रत्नागिरीच्या एसटी विभागात अशा 2 बस असून त्या जप्त करण्यासाठी फायनान्स कंपनीचे अधिकारी रत्नागिरीत आले होते. मात्र, विभाग नियंत्रकांनी कंपनीशी त्यांचं बोलणं करून दिल्यानंतर कंपनीने थकीत रक्कम 2 ते 3 दिवसांत भरण्याचे मान्य केल्याने जप्तीची कारवाई या अधिकाऱ्यांनी तात्पुरती थांबवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमधील कंपनी असलेल्या रेन्बो टुर्स अँन्ड ट्रॅव्हल्सच्या शिवशाही गाड्या एसटीच्या ताफ्यात आहेत. या बसवर हिंदूजा लेलँड फायनान्सचं कर्ज आहे. मात्र, काही महिन्यांपासून या बसेसचे हप्ते कंपनीने भरलेले नाहीत. एका बसचा जवळपास 90 हजार ते 98 हजार हप्ता आहे. असे एका बसचे जवळपास 7 लाख रुपये थकीत आहेत.


 त्यामुळे फायनान्स कंपनी कोर्टात गेली. त्यामुळे कोर्टाने अशा 10 शिवशाही गाड्यांच्या जप्तीचे आदेश दिले आहेत. 27 एप्रिल 2018 रोजी जप्तीची ऑर्डरही निघाली.  त्यानंतर जप्तीची अंमलबजावणी साठी हिंदूजा फायनान्स कंपनीचं जप्ती पथक आज रत्नागिरीत दाखल झालं होतं. रत्नागिरी एसटी विभागात शिवशाहीच्या अशा 2 गाड्यांची जप्ती करण्यात येणार होती.


जप्ती पथक दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान विभाग नियंत्रक अनिल मेहतर यांनी या फायनान्स कंपनीच्या अधिकारयांचे रेन्बो टुर्स अँन्ड ट्रॅव्हल्समधील अधिकाऱ्यांशी बोलणे करून दिलं. यावेळी रेनबो कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दोन ते तीन दिवसांत पैसे भरण्याचे आश्वासन दिल्याने फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हि जप्तीची कारवाई तात्पुरती थांबवली आहे.