कायर वादळाचा सिंधुदुर्ग किनारपट्टीला तडाखा..!
मालवण तालुक्यातील समुद्र किनाऱ्याला जोरदार तडाखा बसला आहे.
प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : कायर वादळाचा सिंधुदुर्गातील देवगड, मालवण तालुक्यातील समुद्र किनाऱ्याला जोरदार तडाखा बसला आहे. समुद्र किनाऱ्यावर महाकाय लाटा आदळत आहेत. शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. देवगड तालुक्यातील अनेक गावं आज पाण्याखाली आहेत. मुणगे, मोर्वे, तांबळडेग, मिठबांव,कातवण, कुणकेश्वर, विजयदुर्ग या गावांना वादळाचा मोठा फटका बसला आहे.
कायर वादळामुळे काही मच्छिमारांची जाळीही सुमद्रात वाहून गेल्याचं समजतंय. गुरुवारपासूनच या भागात अतिवृष्टी सुरू असून भात शेतीत पाणी साचून शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. रस्त्यावर पाणी साचत असल्यानं वाहनचालकांनाही त्रास होतोय.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे रत्नागिरी सिंधुदूर्गात मुसळधार पाऊस बरसतोय. कणकवलीत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरूय. कमी दाबाच्या पट्यामुळे पुढचे 24 तास कोकणात असाच पाऊस होणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय.
कणकवलीसोबत देवगड, वैभववाडीतसुद्धा जोरदार पाऊस होतोय. रत्नागिरीत, राजापूर आणि किनारपट्टी भागात पाऊस होतोय.