दापोली: राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम हे बुवाबाजी आणि जादूटोणा करणारे नेते असल्याचा घणाघाती आरोप दापोली मतदार संघातील शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केला आहे. रामदास कदम आणि सूर्यकांत दळवी हे एकाच पक्षात असले, तरीही त्यांच्यातील विस्तव काही जात नाही. मात्र, सूर्यकांत दळवी यांनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. दरम्यान रामदास कदम यांनी चारवेळा पक्षाच्या विरोधात काम केले असून, त्यांनी दापोली मतदारसंघात घुसखोरी करू नये. असा इशाराही त्यांनी कदम यांना दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामदास कदम हे जादूटोणा करणाऱ्या बुवांना सोबत घेऊन फिरतात. कदम यांना विरोधी पक्षनेता होण्यासाठी देखील आमच्यासोबत भगत दिला होता. दर अमावस्येला रामदास कदम भगतगिरी करायचे, असा दावा देखील सूर्यकांत दळवी यांनी केला.


'गिरीश महाजनांना वशीकरण विद्या अवगत; मुख्यमंत्री फडणवीसांना वश केलेय'


रामदास कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात घुसखोरी करू नये. ज्या मतदारसंघात त्यांचा पराभव झाला त्या मतदार संघातून निवडणूक लढवावी. माझ्या मतदार संघात मी आमदार नसलो तरी चालेल पण या मतदारसंघातला आणि पक्षासाठी त्याच योगदान आहे असा उमेदवार कोणीही चालेल, असेही सूर्यकांत दळवी यांनी म्हटले. कदम यांनी आतपर्यंत चारवेळा पक्षाच्या विरोधात काम केले आहे. याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा ही सूर्यकांत दळवी यांनी केला. त्यामुळे रामदास कदम या आरोपांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.