निसर्गाच्या वेगवेगळ्या सौंदर्याचा अनुभव घेण्यास पर्यटक कायमच पसंती दर्शवत असतात. भारतातील काही ठिकाणां वरील सूर्यास्त पाहण्याची अनुभूती म्हणजे स्वर्गसुखाचा आनंद आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनसेट पॉइंट, कन्याकुमारी 



मावळतीच्या सूर्याच्या रंगीबेरंगी छटा आणि समुद्राच्या दिसणाऱ्या सोनेरी लाटा त्यामुळे या ठिकाणाचं सौंदर्य मोहवणारं असतं. कन्याकुमारी हे भारताचं दक्षिण टोक म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र या तीन समुद्रांचा होणारा संगम पाहण्यास सूर्यास्ताच्यावेळी निसर्गप्रेमी जगाच्या कानाकोपऱ्यातून भेट देण्यास येतात. 


कच्छ, गुजरात 



कच्छच्या सीमेवर झालेल्या  भारत पाकिस्तान युद्धाची इतिहास कायमच साक्ष देत आला आहे. मात्र या व्यतिरिक्त कच्छच्या समुद्राला निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलं आहे. या ठिकाणी मिठागर मोठ्या प्रमाणात असल्याने मावळतीचा सोनेरी रंगाची छटा आणि पांढऱ्या रंगाचा झालेला समुद्रकिनारा मनात घर करून जातो. 


गंगा घाट,वाराणसी 



गंगा नदी आणि वाराणसीला धार्मिकदृष्ट्या महत्त्व जितकं आहे. तेवढंच वाराणसीच्या घाटावरुन दिसणारा सूर्यास्त पाहणं निसर्गप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरते. अस्ताला जाणारा सूर्य, संध्याकाळची सुटणारी गार हवा, आणि गंगेचा पवित्र घाट म्हणजे निसर्गाने दिलेलं वरदान आहे. या ठिकाणी सूर्यास्त अनुभवण्यासाठी खास बोटींगची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.  


टायगर हिल, पश्चिम बंगाल 



 दार्जिलिंगला फिरायला आलेल्या पर्यटकांना टायगर हिल कायमच खुणावतं. धुक्यात हरवत जाणारा सूर्य आणि उंचावरुन दिसणारा माउंट एव्हरेस्ट पाहण्यासाठी पर्यटक कायमच इथे येत असातात. 



 नुब्रा व्हिले, जम्मू आणि काश्मीर 



जम्मू काश्मीरचा बराचसा भाग हा दऱ्या खोऱ्यांनी वेढलेला आहे. बर्फाळ प्रदेशातल्या या ठिकाणी सूर्यास्त मनाला भूरळ घालतो. सुर्यौदयापासून ते सूर्यास्तापर्यंत बदलत जाणाऱ्या छटा, पांढराशुभ्र बर्फाचा डोंगर, संथ वाहणारी नदी आणि हवेतला गारवा. निसर्गाच्या सान्निध्यात असणारं हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. 



ब्रम्हपुत्रा नदी



आशिया खंडातील प्रमुख नद्यांपैकी एक म्हणून ओळखली जाणारी नदी म्हणजे ब्रम्हपुत्रा. हिमालयाच्या कुशीतून वाहणाऱ्या या नदीवरुन दिसणारा सुर्यास्त विलोभनीय आहे. सहसा सूर्यास्त होताना आकाशात सोनेरी रंगांची उधळण होत असते, मात्र भारताच्या उत्तर आणि ईशान्य भागात जांभळ्या आणि लालसर गुलाबी रंगाचा सूर्यास्त दिसून येतो. संथ वाहणारी आणि सोनेरी रंग धारण केलेल्या या नदीचं सौंदर्य त्याचबरोबर आजूबाजूचा स्वच्छ आणि शांत परीसर अनुभवणं म्हणजे पर्वणी ठरते. अरुणाचल प्रदेश आणि आसाम येथे फिरायला येणारे पर्यटक ब्रम्हपुत्रा नदीवरील सूर्यास्त पाहण्यास पसंती देतात. 


 रायगड 



छत्रपतीशिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला रायगड तलवारीच्या पात्यासारखा कणखर आहे. रायगडाचे सौंदर्य पर्यटकांना नेहमीच मोहिनी घालते. सह्याद्रीतील घोंगावणारा वारा आणि भगव्या रंगाची उधळण करणारा सूर्यास्त  डोळ्याचं पारणं फेडतं. सह्याद्री जितका राकट आणि दणकट आहे तितकंच त्याचं सौंदर्य मोहवणारं आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे रायगडावरील सूर्यास्त.