Company Sick Leave Memo Child Sickness: घरातील लहान मूल आजारी असल्याने ऑफिसला आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी दांडी मारली असेल. आपल्या बाळाच्या तब्बेतीपेक्षा महत्त्वाचं काही नाही असं प्रत्येक पालकाला वाटलं. मात्र एका कंपनीने जारी केलेल्या मेमो वाचून पालकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. या कंपनीने आजारी मुलांची काळजी घेण्यासाठी कर्मचारी सुट्टी घेऊ शकत नाही असं फर्मान जारी केलं आहे. हे पत्रक वाचून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. रेडइटवर शेअर करण्यात आलेल्या या पत्रकाला कामगार हक्कविरोधी असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करण्याबरोबरच हे असले आदेश त्यांच्या आयुष्यातील वर्क आणि ऑफिस लाइफ बॅलेन्स बिघडवणारं असल्याचं बऱ्याच जणांनी म्हटलं आहे.


तुमच्या मुलांना आम्ही कामावर ठेवलेलं नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीच्या या मेमोमध्ये, आजारी मुलांची काळजी घेण्यासाठी ऑफिसला गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. "तुमचं मुल आजारी आहे हे ऑफिसला न येण्याचं कारण असू शकत नाही. आता यासंदर्भात लिखित कळवावं लागेल. आम्ही तुमच्या मुलांना कामावर ठेवलेलं नाही. त्यांचं आजारपण हे तुमच्या गैरहजर राहण्याचं कारण असूच शकत नाही. कामाला लागा," असा मजकूर या मेमोमध्ये लिहिलेला आहे. 


उर्मट भाषा वाचून लोक संतापले


हा असा उद्धट आणि असंवेधनशील भाषेतील मेमो वाचून लोक संतापले आहेत. सोशल मीडियावर हा असा आदेश असंवेदनशील असण्याबरोबरच कंपनीला कर्मचाऱ्यांची काहीही काळजी नसल्याचं दर्शवतो अशी टीका केली जात आहे. याचा कर्मचाऱ्यांवर सकारात्मक नाही तर नकारात्मक परिणाम होईल असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. "तुम्ही माझ्या मुलाला कामावर ठेवलं नाही तर तुम्ही माझ्या जोडीदाराला, मित्रांना, माझ्या कुटुंबालाही कामाव ठेवलेलं नाही. त्यांना सगळ्यांना माझी गरज लागू शकते," असं म्हणत संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी आम्ही काम कशासाठी करतो असा प्रश्न हा मेमो वाचून विचारला आहे. मुलांसाठी नाही वेळ देऊ शकत, त्यांची काळजी घेऊ शकत नाही तर असल्या ठिकाणी काम करण्यात काय अर्थ? कामातून कमवलेला पैसा वापरायचा कोणासाठी? असले संतप्त सवालही लोकांनी विचारलेत. 



कंपनीला शोधून कारवाई करण्याची मागणी


बऱ्याच जणांनी हा मेमो नसून महिलांविरोधात काढलेलं फर्मान असल्याची टीका केली आहे. तर अनेकांनी तर या असल्या फाजील नोटीसा काढणाऱ्या कंपनीला शोधून तिच्याविरोधात कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली आहे. सध्या सोशल मीडियावर या नोटीसमुळे वादाची ठिणगी पडलीय हे मात्र खरं.