स्वादिष्ट बीट आणि ओट्सपासून बनवलेले कटलेट्स; एकदा नक्की बनवून पाहा
लहान मुलांना नेहमीच काहीतरी चटपटीत आणि वेगळं खाण्याची आवड असते. त्यांना रोजचे पोहे, उपमा, डोसा यांसारखे पारंपरिक पदार्थ खायला थोडी कटकट करतात. अशा वेळी तुम्ही एक वेगळी आणि चवदार रेसिपी तयार करू शकता, जी मुलांनाही आवडेल आणि त्यांचा आरोग्यासाठी फायदेशीरही असेल.
रोज रोज वेगळा पदार्थ बनवायचा असं सर्व घरच्यांच्या मनात येत असते. मुलांना जंक फूड खाण्याची आवड असते, पण हे त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. अशा परिस्थितीत तुम्ही हेल्दी आणि चवदार ओट्स कटलेट्स बनवून त्यांना एक पौष्टिक पर्याय देऊ शकता. ओट्स हे फायबर्स, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडन्ट्सने भरपूर असतात, जे शरीराच्या रोगप्रतिकार शक्ती बळकट करतात.
तुम्ही यामध्ये आवडीनुसार भाज्या देखील घालू शकता, जे मुलांच्या शरीराला आवश्यक असलेले खनिज आणि व्हिटॅमिन्स पुरवतात. हे कटलेट्स तुम्ही कधीही खास करुन शाळेतील डब्यात, पिकनिकसाठी किंवा घरच्या जेवणात दिले तर मुलांना आवडेल.
तुम्ही हे ओट्स कटलेट्स लहान मुलांच्या आहारात समाविष्ट करू शकता, ज्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारेल आणि त्यांना जंक फूड खाण्याची सवय लागणार नाही. तर हे कटलेट्स कसे बनवावे याची सोपी रेसिपी पाहुयात.
साहित्य
- 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे (किसून घेतलेले)
- 1 उकडलेले बीट (किसून घेतलेला)
- 1 कप किसलेले पनीर
- 1 मोठा कांदा (किसून घेतलेला)
- 1 चमचा आलं-लसूण पेस्ट
- 1-2 हिरव्या मिरच्या
- 1/2 कप ओट्स
- 1/2 चमचा लाल तिखट पूड
- 1/2 चमचा गरम मसाला
- 1/2 चमचा चाट मसाला
- मीठ चवीनुसार
- 1/4 कप कोथिंबीर
- 1/2 कप काजू (अर्धे कापलेले)
- तेल किंवा तूप
हे ही वाचा: उपासाच्या दिवशी बनवा गुलाबी पॅनकेक: स्वादिष्ट आणि पौष्टिक
एका मोठ्या भांड्यात उकडलेले बटाटे, बीट, पनीर, कांदा, आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घाला. यामध्ये ओट्स, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला आणि मीठ चवीनुसार घालून सर्व चांगले मिक्स करा. मिश्रणाचे समान आकाराचे गोळे करा. नंतर ते गोल किंवा इतर तुमच्या इच्छेनुसार आकारात कापून कटलेट्स तयार करा. प्रत्येक कटलेटला ओट्सच्या कोरड्या पावडरमध्ये चांगले घोळवून घ्या. प्रत्येक कटलेटवर काजूचा अर्धा तुकडा ठेवा. त्यानंतर नॉन-स्टिक पॅन गरम करा आणि त्यात थोडे तेल किंवा तूप घाला. कटलेट्स हलक्या आचेवर ठेवा आणि खालील बाजू सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. नंतर कटलेट्स दुसऱ्या बाजूसही सोनेरी भाजून घ्या. तयार केलेले कटलेट्स मसालेदार ग्रीन चटणी किंवा आंबट गोड चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.