`आमंत्रण` आणि `निमंत्रण`मधील फरक ठाऊक आहे का? 99% लोकांना कल्पनाच नसते
Amantran Nimantran Difference In Marathi: आग्रहाचं आमंत्रण आहे किंवा तुम्हाला निमंत्रण द्यायला आलो असं अनेकदा कार्यक्रमांची पत्रिका हातात देताना म्हटलं जातं. पण या 2 शब्दांचा अर्थ सारखाच आहे की वेगळा?
Amantran Nimantran Difference In Marathi: तुळशीचं लग्न लागल्यानंतर आता लग्नांचे मुहूर्त सुरु झाले असून लग्नसराईची लगबग सगळीकडेच दिसून येत आहे. लग्नांबरोबरच आता पुढील काही महिन्यांमध्ये साखरपुड्याचीही अनेकांना आमंत्रणं असणार. मात्र या कार्यक्रमांच्या आमंत्रणांदरम्यान अनेकदा 'आमंत्रण' आणि 'निमंत्रण' असे 2 वेगळे शब्द तुम्हाला अनेकदा ऐकायला मिळतात. तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे किंवा तुम्हाला निमंत्रण द्यायला आलो असं अनेकदा कार्यक्रमांची पत्रिका हातात देताना म्हटलं जातं. पण या 2 शब्दांचा अर्थ सारखाच आहे की वेगळा? हे दोन्ही शब्द एकमेकांना समानार्थी शब्द आहेत की वेगळे? वेगळे असतील तर त्यांच्यातील वेगळेपण काय? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर याच प्रश्नांची उत्तरं आज आपण या लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर जाणून घेणार आहोत.
आमंत्रण आणि निमंत्रणमध्ये नेमका फरक काय?
आधी आपण आमंत्रणासंदर्भात बोलूयात. सामान्यपणे असं मानतात की ज्या कार्यक्रमाची काही विशेष रुपरेषा नसेल आणि ज्यांना कार्यक्रमाला बोलावलं आहे त्यांनी कधीही आपली उपस्थिती दर्शवली तरी हरकत नसते अशावेळेस आमंत्रणं दिलं जातं. आता याच दृष्टीकोनातून निमंत्रणासंदर्भात बोलायचं झालं तर ज्या कार्यक्रमांमध्ये ठराविक वेळी एखादं विशेष कार्य नियोजित असेल त्या कार्यक्रमांचं निमंत्रण दिलं जातं. आता उदाहरणासहीत सांगायचं झालं तर लग्नाचं रिसेप्शन किंवा वाढदिवसाच्या पार्टीचं आमंत्रण असतं. कारण या अशा कार्यक्रमांमध्ये मुहूर्ताला फारसं महत्त्वं नसतं. या उलट लग्नसमारंभ किंवा मुंज यासारख्या कार्यक्रमांसाठी निमंत्रण पाठवलं जातं. म्हणजेच अशा कार्यक्रमांमध्ये ठरलेल्या मुहूर्ताला लग्न लागणं किंवा विधी होणं अपेक्षित असतं. त्यामुळेच निमंत्रित कार्यक्रमांना वेळेत उपस्थित राहण्याचं बंधन असतं तर आमंत्रित कार्यक्रमांना केवळ हजेरी लावून उपस्थिती दर्शवणं अपेक्षित असतं.
आमंत्रण आणि निमंत्रणमध्ये हा ही फरक
इन्स्टाग्रामवर शब्दांची माहिती दिली जाते अशा खलबत्ता या पेजवरील माहितीही रंजक आहे. येथील माहितीनुसार, कोणी आलं किंवा नाही आलं तरी कार्यक्रम पार पडणार असेलच तर अशा वेळी आमंत्रण दिलं जातं. उपचार म्हणून बोलवायचे, ती व्यक्ती आली नाही तरी कार्यक्रम पार पडणारच अशी परिस्थिती असते तेव्हा आमंत्रण देतात. तर दुसरीकडे ठराविक व्यक्ती किंवा व्यक्तींशिवाय नियोजित कार्यक्रम पार पडू शकणार नसेल तर अशा कार्यक्रमांचं निमंत्रण दिलं जातं. कार्यक्रमात पाहुण्याची हजेरी अत्यावश्यक असते किंवा त्या पाहुण्याच्या हजेरीशिवाय कार्यक्रम पार पडणारच नाही अशी परिस्थिती असते तेव्हा निमंत्रण देतात.
अनेक मतमतांतरं
'खलबत्ता'वरील पोस्टनुसार, "आमंत्रण आणि निमंत्रणामधील फरकाबद्दल अनेक मतमतांतरं आहेत. काही जाणकारांचं असं म्हणणं आहे की, आमंत्रण हे अनेकवेळा एखाद्या चालू असलेल्या प्रक्रियेत बोलावणे असतं. उदाहर्णार्थ, मंचावर आमंत्रित करणं तर निमंत्रण हे समारंभास हजर राहण्यासाठीचं आमंत्रण त्यावेळी तेथे तो समारंभ चालू नसतो." "संस्कृत शब्दकोशानुसार आमंत्रणामध्ये जास्त भावना आपुलकी असते तर निमंत्रण हे औपचारिक असतं. आमंत्रणचा एक संस्कृत अर्थ निरोप घेणे असा आहे," असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आता तुम्हाला यापुढे आमंत्रण आणि निमंत्रणासंदर्भात गोंधळ होणार नाही अशी अपेक्षा आहे.