दिवाळी साफसफाई Tips: काळाकुट्ट पडलेला फॅन नव्यासारखा चमकेल; घरात हव्यात फक्त `या` 2 गोष्टी
Diwali Safsafi Ceiling Fan Cleaning Tips: दिवाळीच्या साफसफाईमधील सर्वात कठीण काम म्हणजे सिलींग फॅन साफ करणे! हे काम आपल्या वाट्याला येऊ नये असं घरातील प्रत्येक सदस्याला वाटतं. मात्र हे काम स्मार्टपणे केलं तर फार झटपट करता येईल. कसं ते पाहूयात...
Diwali Safsafi Ceiling Fan Cleaning Tips: काय मग झालं का सगळं प्लॅनिंग? आहो कसलं काय विचारताय, दिवाळीच्या साफसफाईचं... खरं तर दिवाळी म्हटल्यावर शॉपिंग, फराळ, खरेदी या साऱ्यांच्या आधी नंबर लागतो तो दिवाळी पूर्वीच्या साफसफाईचा! जनरेशन झेडच्या भाषेत सांगायचं झालं तर दिवाळीची साफसफाई हे एक रिच्युअल झालं आहे. तर पुढल्याच आठवड्यात दिवाळी असल्याने येणारा शनिवार आणि रविवार संपूर्ण कुटुंब रंगलंय साफसफाईत हे चित्र नक्कीच पाहायला मिळणार. महिला वर्ग तर सगळेच घरी असल्याने जेवढं काही साफ करुन ठेवता येईल त्याप्रमाणे कामाचं नियोजन करणार यात शंका नाही. दिवाळीची साफसफाई तसं वर्षातील ठरलेलं काम असलं तरी अनेकांना एकच भीती असते ती म्हणजे काहीही झालं तरी सिलींग फॅन पुसण्याचं काम आपल्या वाट्याला नको यायला. कारण दिवाळी सफाईमध्ये सर्वात कठीण काम हे फॅन पुसण्याचं समजलं जातं.
घरात हव्यात फक्त दोन गोष्टी
ज्यांनी दिवाळीच्या साफसफाईमध्ये कधी ना कधी मोलाचा हातभार लावले असेल त्यांना नेमकं यात भीतीदायक काय आहे याची कल्पना आलीच असेल. मात्र दिवाळीपूर्वीच्याच काय तर कायमच फॅन साफ करताना शक्तीऐवजी युक्तीचा वापर केला तर अधिक परिणामकारक आणि उत्तम रिझल्ट नक्कीच मिळू शकतात. यासाठी फक्त तुमच्या घरात दोन गोष्टी असायला हव्यात. या दोन गोष्टींचा वापर करुन अगदी काही मिनिटांमध्ये फॅन अगदी पांढऱ्या रंगाचा असो किंवा तपकीरी अगदी चकाचक चमकून उठेल यात शंका नाही. या दोन गोष्टी कोणत्या आणि त्या कशा वापरायच्या ते पाहूयात...
फॅनवरची धूळ पुसताना आव्हानं अनेक
सामान्यपणे फॅन पुसताना आधी सुक्या कापडाने तो पुसला आणि नंतर ओल्या कापडाने पुसला तरी त्यावरील धूळ निघत नाही. त्यात थेट ओल्या कापड्याने फॅन पुसण्याचा प्रयत्न केला तर झालाच बट्टयाबोळ असं समजा. फॅन कितीही वापरात असला तरी त्याच्यावर धूळ बसतेच आणि ही धूळ सहजासहजी निघत नाही. आधीच फॅनची धूळ काढायची म्हटल्यावर शिडी किंवा स्टूलवर चढून हे काम करावं लागत असल्याने ते अवघड पडतं. त्यामुळेच फॅन पुसताना घरातील दोन गोष्टींपासून तयार केलेलं मिश्रण वापरल्यास त्यावरील धूळ सहज काढता येते.
कसं बनवायचं हे मिश्रण :
हे मिश्रण कशापासून बनवता आणि ते कसं बनवतात याची कृती खालीलप्रमाणे :
> पंखा साफ करण्यासाठी तुम्ही थोडंसं व्हिनेगर आणि बेकिंग सोडा म्हणजेच जेवणात वापरतो तो सोडा याचं एकत्र मिश्रण तयार करुन घ्यावं. एका वाटीत थोडं व्हिनेगर घ्या त्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा टाकून ते मिश्रण छान ढवळून घ्या.
> त्यानंतर या मिश्रणाला स्प्रे बॉटलमध्ये भरुन किंवा छोट्या कापडाच्या तुकड्याने फॅनवर जिथे जिथे धूळ आहे तिथे हलक्या हाताने लावा. त्यानंतर पाच मिनिटांनी ओल्या कापड्याने फॅन पुसून घ्या. या मिश्रणामुळे फॅनवरील डाग सहज निघतात. फॅन अगदी नव्या सारखा दिसेल.
> तसेच हे मिश्रण तयार करताना यामध्ये लिंबाचाही वापर परता येईल. लिंबाचा वापर केल्याने फॅन तेलकट झाला असेल तरी तो साफ करणं सहज शक्य होतं. केवळ फॅनच नाही इतर गोष्टींच्या साफसफाईसाठीही हे मिश्रण वापरता येईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)