पाल चावल्याने प्राण जाऊ शकतो का? पाल चावल्यास काय करावं?
House Lizard Bite Poisonous: घरात भिंतीवर दिसणारी पालही चावा घेते हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. मात्र पाल चावल्यानंतर विषबाधा होते का? पाल चावल्यानंतर काय केलं पाहिजे? याचं ज्ञान फार कमी लोकांना आहे.
House Lizard Bite Poisonous: मेलेली पाल अन्नात पडल्याने मध्यान्ह: भोजनातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या अनेक बातम्या तुम्ही यापूर्वी ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील. खरं तर श्रीमंत असो किंवा गरीब असो प्रत्येकाच्या घरामध्ये कधी ना कधी पाल दिसतेच. अनेक लोकांना पालीचं केवळ नाव ऐकलं तरी अंगावर काटा येतो. अनेकांनी पालीची किळस वाटते. पालीबद्दल अनेकांच्या मनात वेगवेगळे गैरसमजही असतात. मात्र पालही तुम्हाला चावू शकते हे माहितीये का? पाल चावलीच तर काय करावं? पाल चावल्यास विषबाधा होते का? याचसंदर्भात सविस्तरपणे जाणून घेऊयात...
पाल चावल्यास जीवाला धोका असतो का?
सोशल मीडियावर अनेकदा अशा प्रश्नासंदर्भातील पोस्ट केल्या जातात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या क्वोरावरही यासंदर्भात अनेकदा सविस्तर चर्चा झाली आहे. आपल्याला पडणारे प्रश्न विचारण्याचा आणि त्यावर इतरांकडून वेगवगेळ्या स्रोतांच्या माध्यमातून उत्तरं जाणून घेण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे क्वोरा. अनेकदा इथे वाटेल ते प्रश्न विचारले जातात. सर्वसामान्यांना ज्या प्रश्नांबद्दल फारशी माहिती नसते त्यावर भरभरुन उत्तरं येतात. काही काळापूर्वी असाच एक प्रश्न युझरने विचारला होता. "पाल चावली तर काय होतं? पाल चावल्यास जीवाला धोका असतो का?" असा प्रश्न विचारण्यात आला होता. अनेकांच्या घरामध्ये पाल दिसते किंवा कधी ना कधी पाल पाहिलेली असल्याने या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच जाणून घेण्याची इच्छा असते. याबद्दलच जाणून घेऊयात...
पाल चावली तर काय करावं?
विचार राठोड नावाच्या व्यक्तीने, "ज्या ठिकाणी पाल चावली आहे ती जागा पाण्याने किंवा डेटॉलने स्वच्छ धुवून घ्यावी. असं केल्यास पालीचं विष शरीरामध्ये पसरत नाही. पालीचे दात हे फार छोट्या आखाराचे असतात. अनेकदा हे दात ज्या ठिकाणी पालीने चावला घेतला तिथं त्वचेमध्येच अकडून पडतात. पाल चावल्यानंतर जिथे पालीने चावा घेतला तो भाग पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. पालीने कचकचून चावा घेतला असेल तर रक्तस्रावही होऊ शकतो. आती रक्तस्राव थांबवावा. पाल चावल्याने टिटॅनस होऊ शकतो. त्यामुळे पाल चावल्यानंतर टिटॅनसचं इंजेक्शन घ्यावं. पालीने ज्या ठिकाणी चावा घेतला आहे तिथे बर्फ लावू नये किंवा मलमपट्टीही करु नये," असं सांगितलं आहे.
पाली विषारी असतात का?
पाल ही विषारी असते का असा प्रश्न विचारण्यात आला आहे. या प्रश्नालाही बऱ्याच लोकांनी माहिती दिली आहे. मात्र इथल्या लोकांनी दिलेली माहिती किती विश्वासार्ह आहे याबद्दल शंकेला नक्कीच वाव आहे. त्यामुळेच एखादी संस्था किंवा विश्वासार्ह स्रोतांच्या माध्यमातून माहिती मिळवायची झाल्यास अमेरिकेतील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार, घरातील पाली या विषारी नसतात. या पालींपासून कोणताही धोका नसतो. मात्र पालीने चावा घेतल्यास पीन लागल्याप्रमाणे छोटीशी जखम होऊ शकते. त्यामुळेच टिटॅनसचं इंजेक्शन आणि प्रथमोपचार करणे नेहमी फायद्याचं ठरतं.