हिवाळ्यात मेथीची भाजी का खावी?, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
Fenugreek Leaves Bhaji: मेथीची भाजी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. शरीराला मेथीची भाजी खाल्ल्याने काय फायदे होतात जाणून घेऊया.
Fenugreek Leaves Bhaji: थंडीच्या दिवसांत हिरव्या पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. हरभऱ्याच्या पाल्याच्या भाजीचे फायदे तर आपण पाहिलेत. पण आता मेथीची भाजी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे जाणून घेऊया. मेथीच्या भाजीत अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. हिवाळ्यात मेथी दाणे किंवा मेथीची भाजी खाणे खूप फायद्याचे असते. तुम्हाला मेथीची भाजी खावून कंटाळा आला तर तुम्ही मेथीचे ठेपले, पराठे असे पदार्थदेखील बनवू शकता. मेथीचा गुणधर्म गरम असल्याने हिवाळ्यात ही भाजी खाल्ल्याने अनेक फायदे होतात.
मेथीची भाजी खाल्ल्याने शरीरातील टॉक्सिक घटक बाहेर पडतात. त्यामुळं त्वचेचे विकार होत नाहीत आणि त्वचा निखरते. मेथीच्या भाजीत फायबरसोबतच अनेक पोषक तत्वे असतात. शरीराला फायबर गरजेचे असते. त्यामुळं वजन नियंत्रणात राहते आणि पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते. मेथीच्या पानात असलेल्या गुणांमुळं वाइट कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. त्यामुळं महिन्यातून तीन ते चार वेळा जेवणात मेथीच्या भाजीचा समावेश करावा. त्यामुळं कॉलेस्ट्रॉल व्यवस्थित राहण्यास मदत होते.
मेथी खाल्ल्याने पाचनासंबंधी समस्या दूर होण्यास फायदेशीर ठरते. तुम्हालादेखील पाचनासंबंधी काही समस्या असतील तर मेथीचा आहारात समावेश करा. यामुळं पोट जड होणे, गॅस अशा समस्यांपासून आराम मिळतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी मेथीचे दाणे किंवा भाजी खाणे खूप फायदेशीर आहे. मासिक पाळीत होणारा त्रासही कमी होतो. शरीरातील लोह कमी असल्यास मेथी खाणे चांगलं ठरतं.
मेथीची भाजी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसंच, मेथीच्या भाजीत असलेल्या गॅलॉक्टोमेनिन घटकामुळं हृदयाचे आरोग्य चांगले राहते. तसंच, हदृयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रित राहतो.
तज्ज्ञांच्या मते, शंभर ग्रॅम मेथीच्या भाजीत 4 ग्रॅम प्रथिने, 6 ग्रॅम कर्बोदके, 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थ, 0 टक्के कोलेस्ट्रॉल, 1 ग्रॅम फायबर्स, 395 mg कॅल्शियम आणि 2 mg लोह हे पोषकघटक असतात. मेथीमध्ये व्हिटॅमिन-C आणि व्हिटॅमिन-A हे दोन्ही जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळतात.
मेथीची भाजी खाण्याचे काही तोटेदेखील आहेत
मेथीची भाजी आरोग्यासाठी जरी फायदेशीर असली तरी काहीजणांना मेथीच्या भाज्यामुळं अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो. मेथीची भाजी अधिक प्रमाणात खाल्ल्यास पोटात वेदना व अतिसार या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळं कधीही भाजी खाताना प्रमाणातच खावी.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)