Christmas Day 2023: निकोलस आणि सांताक्लॉजचा संबंध काय? जाणून घ्या नाताळची खरी गोष्ट
Christmas Day 2023: नाताळचा उत्साह लहान मुलांसोबतच मोठ्यांमध्येही पाहायला मिळतो. रात्री भेटवस्तु देणारा सँताक्लॉज नेमका कोण आणि नाताळची गोष्ट काय, हे जाणून घेऊया.
Christmas Day 2023: जगभरात ख्रिसमसचा उत्सव सुरू झाला आहे. 25 डिसेंबर रोजी जगभरात मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. नाताळ येताच आपल्या डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे लाल कपड्यात, पाठीवर गाठोडे घेऊन येणारा सांताक्लॉज. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का सांताक्लॉज आणि नाताळचा संबंध काय. नाताळ हा सण पाश्चिमात्य देशात का साजरा केला जातो. या सगळ्याची उत्तरे आज जाणून घेऊया तसंच, नाताळची खरी गोष्टदेखील जाणून घ्या.
चौथ्या दशकात एशिया मायनरच्या म्हणजेच आत्ताचे तुर्की येथे सेंट निकोलस नावाचा एक व्यक्ती राहत होता. तो खूप श्रीमंत होता. जेव्हा त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले तेव्हा तो गरिबांना मदत करायचा. त्यांना सिक्रेट गिफ्ट देऊन खुश करायचा. एकदा निकोलस कळलं की एका गरीब व्यक्तीच्या तीन मुली होत्या. त्यांची लग्न करण्यासाठी त्यांच्याकडे अजिबात पैसे नव्हते. हे कळल्यानंतर निकोलस त्या व्यक्तीची मदत करण्यासाठी गेले. एका रात्री निकोलसने त्या गरीब व्यक्तीच्या घराकडे पोहोचले आणि त्याच्या दरवाजावर सोन्याची बॅग ठेवून निघून गेले. असं एकदा नव्हे तर तीन वेळा झालं होतं.
अखेर एकदा एका व्यक्तीने निकोलसला घराबाहेर भेटवस्तु ठेवताना पाहिलं होतं. पुढे हळहळू निकोलस संत म्हणून पुढे आले. संत निकोलसचा कनवाळू स्वभाव सांताक्लॉजसारखाच दयाळू, प्रेमाळू, मनमिळाऊ होता. गोरगरीब बालकांचे ते कैवारी. अबलांना विशेष करून निराश्रित स्त्रियांना ते प्रेमाने समजून घ्यायचे. तेव्हापासून निकोलस आणि सांताक्लॉज हे नाव प्रचालित झाले. तेव्हापासून सांताक्लॉज रात्री येऊन गिफ्ट ठेवून जाणार हे बाळगोपाळांच्या मनात अगदी रुजून गेली आहे.
आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया,युरोप व अमेरिका या पाचही खंडात युरोप सर्वात जास्त थंड खंड आहे. हिवाळ्याच्या दिवसांत खूप थंडी पडते तसंच बर्फ साचतो अशावेळी घराबाहेर पडणं खूप कठिण होऊन जाते. गारठ्यात उब आणण्यासाठी बदाम, पिस्ता, आक्रोड, खजूर असे पदार्थ खाल्ले जायचे. तसंच, चौथ्या शतकात बाळ येशूच्या जयंतीच्या रूपाने सांताक्लॉजची कल्पना रुजली आणि पुढे सर्वच ठिकाणी ही परंपरा सुरू झाली. आत्ता जगाच्या कानाकोपऱ्यात ही परंपरा सुरू झाली. काजू, बदाम आणि सर्व उष्ण पदार्थांपासून विविध पदार्थ व केक यादिवशी बनवले जाऊ लागले.