अस्सल गावरान `काकडीचा कोरडा`; 10 मिनिटांत तयार होणारा महाराष्ट्रीयन पदार्थ, रेसिपी लिहून घ्या
10 मिनिटांत तयार होणारा महाराष्ट्रीयन पदार्थ; अस्सल गावरान `काकडीचा कोरडा;ची रेसिपी
Healthy Recipe In Marathi: थंडी सरून आता उन्हाळा सुरू होणार आहे. मार्च महिन्यातच वातावरण उष्ण जाणवू लागले आहे. उन्हाळ्यात उष्णता कमी करणारे पदार्थ खाण्यास सांगितले जाते. काकडी (CuCumber) ही उन्हाळ्यात खाल्ली जाते. महाराष्ट्रात काकडीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला काकडीचा कोरडा कसं बनवायचा हे सांगणार आहोत. काकडीचा कोरडा तुम्ही चपातीसोबतही खावू शकता. (CuCumber Recipe In Marathi)
बेसनाचा झुणका किवा पिठलं तर तुम्ही नेहमीच खात असाल. नेहमी तेच तेच खावून कंटाळलात असाल तर आता काकडीपासून तयार होणारी ही नवीन रेसिपी ट्राय करुन पाहा. ही भाजी तुम्हालादेखील नक्कीच आवडेल. फक्त 10 मिनिटांत तयार होणारा अस्सल महाराष्ट्रीय पदार्थ हा आहे. सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर @diningwithdhoot वरुन हा शेअर करण्यात आला आहे. तर पाहूयात या पदार्थाची सोप्पी रेसिपी.
साहित्य
तेल
2 काकडी
1 हिरवी मिरची
बेसन
मोहरी
हिंग
हळद
लाल तिखट
कोथिंबीर
मीठ
काकडीच्या कोरडाची रेसिपी
सगळ्यात पहिले काकडी सोलून घ्या. त्यानंतर काकडी कापून एकमेकांवर घासा जेणेकरुन त्यातील कडवटपणा निघून जाईल. त्यानंतर काकडी किसून घ्या. किसलेल्या काकडीचा किस हाताने दाबून घ्या आणि सर्व पाणी काढून घ्या. आता एका बाजूला हा काकडीचा किस ठेवून द्या.
आता एका कढाईत चमचाभर तेल घालावे. तेल चांगले तापल्यानंतर त्यात मोहरी, हिंग, बारीक चिरलेल्या मिरच्याची फोडणी द्या. हे सर्व साहित्य चांगलं परतून घेतल्यानंतर आता त्यात हळद आणि लाल तिखट घालून इतर पदार्थांसह परतून घ्या. आता या फोडणीत किसलेल्या काकडीचा किस घालावा, पुन्हा सर्व साहित्य एकजीव करुन घ्या.
काही वेळासाठी हे सर्व मिश्रण मंद आचेवर शिजवून घ्या. काकडी शिजत आल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाका. त्याचबरोबर बेसनमध्ये थोडे पाणी टाकून त्याचे मिश्रण तयार करुन ते यात घालून सर्व एकत्रित करुन घ्या. पुन्हा एकदा सर्व पदार्थ व्यवस्थित शिजवून घ्या. सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एक दोन मिनिटांसाठी एक वाफ काढून घ्या. 10 मिनिटांत मस्त आणि पौष्टिक काकडीचा कोरडा तयार आहे. तुम्ही हा काकडीचा कोरडा भात किंवा चपात्यांसोबतदेखील खाऊ शकता.
टिप- किसलेल्या काकडीचे पाणी काढून घेतल्यानंतर जे पाणी उरले आहे त्यातच बेसन टाकून मिश्रण केले तरी चालते. यामुळं काकडीचे पौष्टिक तत्वे मिळतील.