Makar Sankranti 2025: मकरसंक्रातीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळं आता गृहिणींची लगबग सुरू झालीये ती तिळगुळाचे लाडू करण्याची. हल्ली ऑफिसात जाणाऱ्या महिलांना वेळेअभावी लाडू करायला जमत नाही. त्यामुळं अनेक महिला बाजारातून लाडू आणतात. मात्र त्या लाडवांना घरच्यासारखी चव नसते. त्यामुळं आज आम्ही तुम्हाला अगदी कमी वेळात तिळाचे लाडू कसे करता येतील, याच्या टिप्स सांगणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिळाचे लाडू करायचे म्हणजे साखरेचा किंवा गुळाचा पाक करावा लागतो. पण हा पाक अगदी परफेक्ट जमायला हवा. पाक जर परफेक्ट जमला नाही तर लाडू फसतात. त्यामुळं आज आम्ही तुम्हाला पाक न करतानाही तिळाचे लाडू कसे करता येतील याच्या काही टिप्स सांगणार आहोत. जाणून घेऊया 10 मिनिटांत तिळाचे लाडू करण्याची सोप्पी रेसिपी.


साहित्य 


पांढरे तिळ, शेंगदाणे, गूळ, वेलची आणि जायफळ पावडर


कृती


सगळ्यात आधी पांढरे तीळ चांगले भाजून घ्या. नंतर त्याच कढाईत शेंगदाणेदेखील भाजून घ्या. शेंगदाण्याची सालं काढून घ्या. 


आता तीळ आणि शेंगदाणे वेगवेगळे बारीक करून घ्या. तीळ, शेंगदाण्याचा बारीक कूट एका भांड्यात काढून त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर, बारीक किसलेला गुळ आणि थोडं गरम केलेले तूप घाला. 


आता सगळे जिन्नस एकत्र करुन चांगले कालवून घ्या. आता  तुम्हाला हव्या असलेल्या आकारात लाडू वळून घ्या. जर लाडुचे मिश्रण तुम्हाला करोडं वाटत असेल तर त्यात गरजेनुसार तूप घाला आणि पुन्हा लाडू वळून घ्या.



तिळाचे लाडू खाण्याचे फायदे


मकर संक्रांतीला तिळाचे लाडू बनवून खाण्याची परंपरा खूप जुनी आहे. तिळाचा लाडू खाणं हदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो. तीळ आणि गूळ घालून तयार केलेले लाडू हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्याचे काम करतात. तिळामध्ये असलेले फायबर आणि गुळातील पोषक तत्वांमुळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्याचा अनुभव येतो.