Supreme Court On Breakup Of Relationship: सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) प्रेमसंबंधांमधून निर्माण झालेल्या गुंतागुंतीनंतर पुरुषांवर होणाऱ्या आरोपांसंदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला आहे. प्रेमसंबंधात असलेल्या पुरुष आणि महिलेने सहमतीने शरीरसंबंध ठेवले आणि नंतर त्यांचं ब्रेकअप झाल्यास पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. एका प्रकरणाची सुनावणी करताना, प्रेमसंबंधांनंतर लग्न झालं नाही आणि ब्रेक अप झाल्यास पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल करता येणार नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. लग्नाचं वचन देऊन प्रियकराने आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला होता. या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर यांच्या खंडपीठाने हा महत्त्वाचा निकाल दिला आहे.


न्यायालयाने काय म्हटलं आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आपला निर्णय दिला. निकालामध्ये न्यायालायने, ज्या नात्यात सहमतीने प्रेमसंबंध ठेवण्यात आले, शारीरसंबंध प्रस्थापित झाले अशा नात्यांमध्ये ब्रेक अप झाल्यास म्हणजेच नातं तुटल्यास पुरुषावर बलात्कार किंवा लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असं म्हटलं आहे. परस्पर सहमतीमधून संबंध प्रस्थापित करुन नंतर मतभेद झाल्यास पुरुषावर आरोप करत अशा प्रकरणांना कुठल्याही प्रकारचा गुन्ह्याचा रंग देता येणार नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. 


नेमकं प्रकरण काय?


तक्रारदार महिलेने 2019 मध्ये या प्रकरणामध्ये आरोप करण्यात आलेल्या पुरुषाविरोधात एफआयआर दाखल केली होती. प्रियकराने लग्नाचं वचन देऊन माझ्यावर बलात्कार केला, माझं लैंगिक शोषण केलं, असं या तरुणीने म्हटलं होतं. त्याने बळजबरीने माझ्याबरोबर शरीरसंबंध ठेवले. लैंगिक संबंध ठेवले नाहीस तर तुझ्या कुटुंबाला मी इजा पोहचवेन, अशी धमकीही त्याने दिल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला होता. सदर तक्रारीनंतर आरोपीविरोधात कलम 376 (2) आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र हा गुन्हा रद्द करण्यासाठी सदर पुरुषाने न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला. आधी या प्रकरणाची दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं, असं 'लाइव्ह लॉ'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.


या प्रकरणामध्ये महिलेने केलेले आरोप तथ्यहीन आहेत असं सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर म्हटलं. सदर पुरुष तुझ्यावर बलात्कार करत होता, तुझं लैंगिक शोषण करत होता तरीही तू त्याला का भेटत होतीस? असा सवाल न्यायालयाने याचिका करणाऱ्या महिलेला विचारला. दोघंही सज्ञान असल्याने त्यांच्यात सहमतीने शरीरसंबंध प्रस्थापित झाल्याचं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं. महिला करत असलेल्या आरोपाप्रमाणे लग्नाचं वचन देऊन हे सारं सुरु होतं याचा कुठलाही ठोस पुरावा अथवा संदर्भ सुनाणीदरम्यान समोर आला नाही, असं निरिक्षणही न्यायालयाने नोंदवलं. त्यामुळेच सर्व घटनाक्रम आणि परिस्थितीनुसार सर्वोच्च न्यायालयाने पुरुषाला दिलासा देणार निर्णय घेत या प्रकरणामध्ये त्याची निर्दोष मुक्तता केली.