पहिल्या पीरियड्सचा तणाव, 14 वर्षांच्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; पालक म्हणून तुमची भूमिका महत्वाची!
पहिल्यांदा आलेल्या मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्यामुळे 14 वर्षीय तरुणीने आत्महत्या करुन आयुष्य संपवल आहे. मासिक पाळीबाबत मुलींना योग्य ज्ञान नसल्यामुळे त्याबद्दल वाटणारी भीती कशी कमी करु शकतात. पालकांची भूमिका या सगळ्यात किती महत्त्वाची.
Periods Stress : मुंबईतील मालवणी परिसरात अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. 14 वर्षीय मुलीला पहिल्यांदाच मासिक पाळी आली. मासिक पाळीतील वेदना असह्य झाल्याने मंगळवारी रात्री मालवणी परिसरातील 14 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मासिक पाळीबाबत माहिती नसल्याने ही मुलगी तणावाखाली होती. त्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले आणि मंगळवारी संध्याकाळी कुणी घरी नसताना आत्महत्या केली.
या घटनेने संपूर्ण परिसरात तणावाच वातावरण आहे. पालकांनी देखील दिलेल्या माहितीनुसार, मुलगी पहिल्यांदा मासिक पाळी आल्यामुळे तणावाखाली होती. पीरियड्सच्या वेदना तिला सहन होत नव्हत्या. एवढंच नव्हे तर ती अस्वस्थ झाली असून तणावाखाली देखील गेली होती. यामुळेच मुलीने इतके टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.
या सगळ्या प्रकरणानंतर पालकांचा मासिक पाळी संदर्भातील मुलींशी संवाद किती महत्त्वाचा अधोरेखित होत आहे. पालकांनी मुली वयात येतानाच त्यांच्याशी मासिक पाळी आणि त्यानंतर शरीरात होणाऱ्या बदलांबाबत बोलले पाहिजे.
पालकांनी मुलींना मासिक पाळीबद्दल सांगाव्यात 5 गोष्टी
अतिशय सामान्य - मासिक पाळी ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. वयात येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या आयुष्यात ही गोष्ट घडत असते. 9 ते 16 वयोगटातील मुलींना मासिक पाळी येते. त्यामुळे प्रत्येक पालकांनी मुलीला ही बाब अतिशय सामान्य असल्याचे अगदी मुलीच्या सुरुवातीच्या काळात सांगावे.
हा आजार नाही - पालकांनी प्रत्येक मुलीला मासिक पाळी हा काही आजार नाही. म्हणजे या पाच ते सात दिवसांमध्ये मुली अतिशय दररोजच्या गोष्टी करु शकतात. जसे की, शाळेत जाणे, भावंडांसोबत खेळणे, आहार घेणे अगदी नातेवाईकांकडे जाणे असेल ते देखील अतिशय सामान्यपणे करु शकतात. पालकांनी मुलींना या गोष्टी सांगाव्यात.
आईने शेअर करावा अनुभव - मुलीला या दिवसांमध्ये सगळ्यात जवळची व्यक्ती असते आई. त्यामुळे आईने आपल्या पहिल्या मासिक पाळीचा अनुभव सांगावा. तसेच मोठी बहिण घरी असेल तर तिने देखील लहान मुलीशी संवाद साधावा.
मासिक पाळी गुपित नाही - समजूतदार असणे आणि एखादी गोष्ट गुप्त ठेवणे यात मोठा फरक आहे. कारण तुम्हाला भीती वाटते किंवा लाज वाटते. त्यामुळे मासिक पाळी हा काही आजार नाही जो गुपित ठेवणे आवश्यक आहे.
कधी कधी त्रास होतो - मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अनेक मुलींना ठराविक त्रास होतो. किंवा काही महिलांना कधी कधी या दिवसांमध्ये वेदनादाई त्रास होतो, हे पालकांनी मुलीला सांगावे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर उपचार आहेत ते देखील आपण घेऊ शकतो, याची माहिती देखील पालकांनी द्यावी.