Importance of Friendship : 'लहानपण देगा देवा...' असं अनेकजण म्हणतात. वयात आलेल्यांना अनेकदा ही म्हण पटतेसुद्धा. वय वाढत जातं, शाळेच्या जीवनात असणारे मैत्रीचे बंध आयुष्याच्या चक्रामध्ये इतके विखुरतात की अनेकदा ज्या मित्रमैत्रीणिंना आपण जिवलग म्हणून हाक मारत होतो तिच मंडळी भेटणंही अशक्य होऊन जातं. अनेकदा मतभेदांमुळं मैत्रीच्या या नात्यात दुरावा येतो आणि नात्यांची व्याख्यात बदलून जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वय वाढत जातं तसतसं जीवनातील प्रत्येक गोष्ट बदलत जाते. खाण्यापिण्याच्या सवयींपासून करिअरसाठीच्या धडपडीपर्यंत वाढत्या वयातील अनेकांनाच मैत्रिची नाती टीकवणं अवघड होऊन बसतं. पण, फावल्या वेळात जेव्हा याच मित्रांची आठवण येते तेव्हा मात्र मित्रमैत्रिणींच्या आठवणींनी नकळत डोळे पाणावतात आणि मग नेमकी चूक झाली कुठे, संवाद थांबला कुठे, ही डोक्याला ताप देणारी पण तरीही हवीहवीशी वाटणारी माणसं आहेत तरी कुठे? हे असे प्रश्न मनात घर करू लागतात. दुनियादारी कळू लागल्यानंतर नवे मित्र बनवणं आणि टिकवणं कठीण का होऊ लागतं? तर इथं अनेकदा स्वभाव, मतभेद, मनातील घालमेल आणि गैरसमज कारणीभूत ठरतात. अनेकदा त्रयस्त व्यक्तीच्या सांगण्यावरून काही चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवल्यासही या सुरेख नात्याला तडा जातो. त्यामुळं मैत्रीच्या नात्यात First Person संवाद महत्त्वाचा. 


मैत्री करण्यापेक्षा ती टीकवणं म्हणजे खरी तारेवरची कसरत असते. पण, मुळात मैत्री नेमकी इतकी महत्त्वाची का तुम्हाला माहितीये? व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर मैत्रीच्या नात्याचा थेट परिणाम होत असतो. अनेकदा कितीही तणाव असला तरीही मित्रमैत्रीणींशी संवाद साधल्यानंतर हा तणावही कुठच्याकुठे पळून जातो. नैराश्याच्या गर्त छायेतून हीच मैत्री एखाद्याला इतकी अलगद बाहेर काढते की लक्षातही येत नाही. 


करिअर म्हणू नका किंवा वैयक्तिक जीवनातील महत्त्वाचे निर्णय, वेळप्रसंगी ही मैत्री सल्लागार म्हणूनही पाठिशी खंबीरपणे उभी असते. त्यामुळं पडत्या काळात नातलगांपेक्षा मित्रच साथ देतात असं म्हटलं जातं. 


मित्र कसे निवडावेत? 


मैत्रीच्या नात्यात दोन्ही बाजुंनी प्रयत्न केले जाणं, मैत्रिचं नातं टीकवण्याची भावना मनात असणं अतिशय महत्त्वाचं असतं. याशिवाय संयमही तितकाच महत्त्वाचा. एखाद्या वेळी समोरच्याचं म्हणणं ऐकण्यासोबतच आपली भूमिका मांडताना कुठंही घाई होणार नाही याची काळजी घेतली जाणं महत्त्वाचं. मुळात गल्लीबोळात मित्रमंडळी असण्यापेक्षा हाकेला धावणारी दोन-चार मित्रमंडीळीही कायमच पुरेशी ठरतात. मैत्रीच्या या नात्यात एकमेकांना आदर दिला जाणं ही आणखी एक महत्त्वाची बाब. 


हेसुद्धा वाचा : IPL च्या प्रत्येक पर्वातून SRK किती कमवतो? 


सॅन फ्रान्सिस्को येथील healthy relationships  तज्ज्ञ आणि 'Frientimacy: How to Deepen Friendships for Lifelong Health and Happiness' च्या लेखिका साश्ता नेल्सन यांच्या मते घनिष्ट मित्रांची यादी बनवून, या मित्रांना मेसेज, किंवा भेटण्यासाठीचा बेत आखण्याच्या निमित्त बोलतं करावं. एखादा छानसा फोटो, आठवणीतील एखादी गोष्ट या मित्रांसमवेत शेअर करावी. मित्रांची आठवण करून देणारा एखादा लेखही तुम्ही त्यांना पाठवू शकता. यामुळं मैत्रिचं नातं आणखी घट्ट होतं. 


मैत्री कशी टीकवावी? 


अनेकदा मैत्री करणं अतिशय सोपं असतं, पण ती टीकवताना मात्र तारेवरची कसरत होते. अशा वेळी नेमकं काय करावं? 


  • नात्यातील दुवा शोधा- मैत्रीच्या नात्यात मतभेद किंवा मतमतांतरं असल्याच सुवर्णमध्य साधणारा एखादा दुवा शोधा, गोष्टी सोप्या होतील. 

  • खरेपणानं वागा- मित्रांशी आणि मुख्य म्हणजे स्वत:शी खरेपणानं वागा. मैत्रीचं नातं आपोआप बहरेल. 

  • मर्यादांचा मान राखा- मैत्रीमध्ये एकमेकांच्या मर्यादा ओळखून त्यांचा मान राखणं आणि एकमेकांकडे सन्मानानं पाहणं हीसुद्धा महत्त्वाची बाब. 

  • संपर्कात राहा- इथं संपर्कात राहणं म्हणजे वारंवार भेटणं नव्हे, पण एखादा मेसेज, कधीकाळी केलेला फोन किंवा आपलेपणानं केलेली चौकशीसुद्धा मैत्रीच्या नात्यात मोठा आधार देऊन जाते. त्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्या. 

  • वाद मिटवा- मैत्री आहे तिथं रागरुसवे येणार. पण,  ही परिस्थिती, मतभेद तितक्याच वेगानं मिटवा, किमान त्यासाठी प्रयत्न करा. अबोला न धरता मनमोकळा संवाद साधा, अनेक गोष्टी तिथंच लक्षात येतील. महत्त्वाचं म्हणजे चुकांचा स्वीकार करायला शिका आणि मित्रांचा विश्वासघात करु नका. 


मैत्री करणं आणि मैत्रिचं हे नातं आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत टीकवणं ही अतिशय कसबीची बाब असून त्यासाठी प्रयत्नांवाचून पर्याय नाही. त्यामुळं प्रयत्नांची साखळी तुटू न देता निस्वार्थपणे काही नाती जपायला शिका. इतरांशी खरेपणानं वागण्याआधी स्वत:ची फसवणूक करणं थांबवा आणि सुरेख, दीर्घकाळ टीकणारं नातं आयुष्यात बहर आणताना पाहा.