लाकडी चॉपिंग बोर्डचा वापर करणं धोकादायक? कोणता चॉपिंग बोर्ड वापरणं योग्य?
Chopping Board: किचनमध्ये चॉपिंग बोर्ड ही एक महत्त्वाची वस्तू आहे. काहीजण लाकडाचा तर काहीजण स्टील किंवा इतर चॉपिंग बोर्ड वापरतात. पण कोणता चॉपिंग बोर्ड वापरणं जास्त योग्य आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
Wooden Chopping Board Risky: प्लास्टिक चॉपिंग बोर्डचा वापर करणं आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक ठरु शकतो याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. प्लास्टिक चॉपिंग बोर्ड वापरल्याने कॅन्सर सारखे मोठे आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळेच आपण प्लास्टिक चॉपिंग बोर्ड टाळतो आणि लाकडी चॉपिंग बोर्ड वापरतो. पण काही तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार लाकडी चॉपिंग बोर्डसुद्धा आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
लाकडी चॉपिंग बोर्ड वापरण्याचे दुष्परिणाम:
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथील वरिष्ठ क्लिनिकल आहारतज्ज्ञांच्या मतांनुसार लाकडी चॉपिंग बोर्ड कापलेल्या खाद्यपदार्थांमधून सहजपणे ओलावा शोषून घेतात. मग ते ताज्या टोमॅटोचा रस, कच्च्या चिकनचे अवशेष किंवा आले-लसूण तेल असो. यामुळे जीवाणू, बुरशी वाढण्यासाठी एक परिपूर्ण वातावरण तयार होते. लाकडी चॉपिंग बोर्डच्या नियमित वापरामुळे त्याच्या पृष्ठभागावर लहान खाचे आणि ओरखडे येतात. या लहान भेगा पूर्णपणे स्वच्छ करणे कठीण आहे. या अस्वच्छ बोर्डवरील जीवाणू (बॅक्टेरिया) अन्न दुषित करू शकतात, त्यामुळे साल्मोनेला, ई. कोलाई, ई. कोली आणि लिस्टेरिया सारख्या हानिकारक रोगांची लागण होऊ शकते. जसे जसे हे चॉपिंग बोर्ड जुने होतात, त्याचे बारीक कण अन्नात मिसळून गंभीर आजार होण्याचे कारण बनू शकतात.
लाकडी चॉपिंग बोर्डमुळे होणारे गंभीर आजार:
1. पोटाचा फ्लू (Stomach flu): लाकडी चॉपिंग बोर्ड नीट स्वच्छ झाले नाहीत तर त्यात तयार झालेल्या 'बॅक्टेरिया'मुळे ताप, उलट्या, डिहाइड्रेशन, जुलाब यांसारखे संसर्गजन्य रोग होऊ शकतात.
2. फंगल कंटॅमिनेशन (Fungal Contamination): लाकडी चॉपिंग बोर्डच्या ओलाव्यामुळे त्यावर बुरशी लागते. या बुरशीमुळे मायकोटॉक्सिन तयार होऊ शकतात, जे श्वसनाच्या समस्या आणि ऍलर्जीक आजार होऊ शकतात.
3. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (Gastrointestinal Irritation): जुन्या लाकडी चॉपिंग बोर्डमधून लहान तुकडे किंवा लाकडाचे कण पोटाच्या आतड्यांना त्रास देऊ शकतात, किंवा अस्वस्थता निर्माण करू शकतात. कित्येक वेळा यामुळे आतड्याला दुखापत होऊ शकते.
कोणते चॉपिंग बोर्ड वापरावे?
1. बांबू चॉपिंग बोर्ड (Bamboo Chopping Board):
हे एक सोयीस्कर चॉपिंग बोर्ड आहे. बांबू चॉपिंग बोर्ड हे टिकाऊ आणि इको फ्रेंडली साधन आहे. हे लाकडी चॉपिंग बोर्डसारखे सहजपणे ओलावा शोषून घेत नाही.
2. ग्लास किंवा ऍक्रेलिक बोर्ड (Glass or Acrylic Board):
ग्लास किंवा ऍक्रेलिक बोर्ड सहजपणे स्वच्छ करता येतात. हे चॉपिंग बोर्ड अजिबात ओलावा शोषत नाहीत.
3. स्टीलचे चॉपिंग बोर्ड (Steel Boards):
सध्या बऱ्याचशा घरातील स्वयंपाक घरात स्टीलचे चॉपिंग बोर्ड पाहायला मिळतात. ते टिकाऊ तसेच नॉन-पोर्स असतात. स्टीलचे चॉपिंग बोर्ड पटकन स्वच्छ होतात. हायजीनच्या दृष्टीकोनातून स्टीलचे चॉपिंग बोर्ड खूपच फायद्याचे ठरतात.
4. कंपोजिट बोर्ड (Composite Board):
कंपोजिट बोर्ड रेजीन आणि लाकडाच्या सहाय्याने बनवले जाते. हे बोर्ड टिकाऊ असतात. त्याचबरोबर लाकडाच्या चॉपिंग बोर्डच्या तुलनेत कंपोजिट बोर्डचा खडबडीतपणा कमी असतो. त्यामुळे अशा बोर्डवर कापताना चाकूच्या ओरखडे कमी प्रमाणात दिसतात. स्वच्छ करण्यासाठी सुद्धा हे खूप सोपे असल्यामुळे या बोर्डचा वापर करणे सोयीचे मानले जाते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)