लहान मुलांना कोणत्या वयापासून ट्रेकिंगला न्यावं? महाराष्ट्रातील `हे` बेस्ट ट्रेक त्यांच्यासाठीच...
Monsoon Treks : तुम्हीही मुलांना ट्रेकला नेऊ इच्छिता, पण न्यावं की नाही हा प्रश्न पडतोय? त्यांना हे झेपेल ना... हाच पहिला प्रश्न पडतोय? वाचा ही माहिती...
Monsoon Trekking Places in Maharashtra : पावसाळा सुरु झाला आहे. अद्याप अपेक्षित पाऊस महाराष्ट्रात बरसला नसला तरीही ट्रेकिंगसाठी घराबाहेर पडणाऱ्या मंडळींनी यंदाच्या वर्षासाठीचे बेत आखण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी काहीतरी नवं करावं, या हेतूनं काही पालकांनी त्यांच्या मुलांना ट्रेकसाठी नेण्याचा विचारही केला आहे. पण, लहानग्यांना ट्रेकवर नेण्याचं योग्य वय काय आहे माहितीये?
लहान मुलांना ट्रेकवर कधी न्यावं?
शक्य तितक्या कमी वयात लहान मुलांना ट्रेकिंगला नेण्याचा सल्ला या क्षेत्रातील जाणकार देतात. पण, अर्थातच पालकांनी काही गोष्टी लक्षात घेणंही तितकंच महत्त्वाचं. लहान मुलं दर दिवशी मोठी होत असतात. त्यांचं शरीर, शरीरातील प्रत्येक अवयव दिसगाणिक प्रगती करत असतो, त्यांचे स्नायूही रचना बदलत असतात. दिवसभराच्या खेळामुळं मुलांची फुफ्फुसंही उत्तम काम करू लागतात आणि त्यांचा उत्साह अद्वितीय असतो.
थोडक्यात मुलांना लहान वयापासूनच निसर्गाच्या सानिध्ध्यात वावरण्याची सवय लावा. सर्वप्रथम त्यांना चालण्याची आवड निर्माण होईल असं काहीतरी करा. एखाद्या समुद्रकिनारी चालणं, नदीकिनारी विविध आकाराचे दगड गोळा करणं या आणि अशा अनेक शकला लढवत तुम्ही मुलांमध्ये ट्रेकिंगची आवड रुजवण्यात सुरुवात करू शकता. मुलं तीन वर्षांची असताना या गोष्टी करणं अधिक सोयीचं असतं.
पुढे चार ते पाच वर्षांच्या वयात लहान मुलं अधिक सक्रिय आणि चपळ असतात. त्यामुळं या टप्प्यावर त्यांना कमी उंचीचे चढ, पठारं आणि गवताळ भागांवर त्यांना भटकंतीसाठी न्या. यामध्ये त्यांच्याशी स्पर्धा लावून बक्षीस आणि तत्सम गोष्टींबाबत त्यांच्यामध्ये ओढ निर्माण करा. पक्षी निरीक्षण, वृक्ष निरीक्षण आणि निसर्गाशी एकरुप होण्यासाठी मुलांना मदत करा. या साऱ्यामध्ये पालकानाही सर्वप्रथम निसर्गाबाबत आत्मियता वाटणं हा महत्त्वाचा घटक. वयाच्या सहाव्या ते सातव्या वर्षापर्यंत मुलांना ट्रेकला नेणं योग्य ठरतं. दगड-खडकांच्या वाटेवरून चालणं, जरासं खरचटलं तरीही त्याकडे फारसं लक्ष न देणं हे मुलांना सहज जमू लागतं आणि तिथं अनेक गोष्टी साध्य होतात. वयाच्या नवव्या आणि दहाव्या वर्षी मुलं ट्रेकवर स्वत:ला सावरु लागतात आणि यावेळी ते स्वत:हून ट्रेकचा आनंद घ्यायला शिकतात.
महाराष्ट्रातील लहान मुलांसाठीचे ट्रेक....
प्रबळमाची ट्रेक
कर्नाळा ट्रेक
सोंडई ट्रेक
कोरिगड ट्रेक
वन ट्री हिल पॉईंट ट्रेक, माथेरान
लोहगड ट्रेक
हेसुद्धा वाचा : बटाटा वडा, वडा पावमध्ये किती कॅलरी असतात?
नऊ ते दहा वर्षांच्या मुलांसाठी हिमालयन ट्रेक
देओरीताल चंद्रशिला
केदारकंथा
ब्रह्मताल
हर की दून
बिआस कुंड
भ्रिगू लेक
ट्रेकला जात असताना प्रत्येकाची शारीरिक क्षमताही अतिशय महत्त्वाची असून, प्रत्येक ट्रेक प्रत्येकाला जमेलच असं नाही, त्यामुळं ट्रेकसंदर्भात योग्य ती माहिती मिळवून त्यानंतरच पुढचा निर्णय घेण्याचा सल्ला दिला जातो.