Mahavitaran Strike LIVE : वीज कर्मचारी संपावर तोडगा निघाला

Surendra Gangan Wed, 04 Jan 2023-3:57 pm,

Mahavitaran Strike News :महावितरण कंपनीच्या (MSEB) खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला होता, आता देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच्या बैठकीनंतर वीज कर्मचारी संपावर तोडगा निघाला आहे

Mahavitaran Strike Latest News  : राज्यभरातील बत्ती आजपासून गुल झाली आहे. महावितरण कंपनीच्या (MSEB Employee Strike) खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला आहे. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला होता. अखेर सरकारने हा कायदा लागू केला आहे. त्यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. सरकारच्या इशाऱ्यानंतरही संपकरी कर्मचारी ठाम आहेत.

Latest Updates

  • संपामुळे हॉस्पिटलमध्ये उडाली तारांबळ, जनरेटरचा घेतला आधार

     Mahavitaran Strike News : बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केलेला संपामुळे तारांबळ उठली आहे. रुग्णांची आणि नातेवाईकांची धावपळ होताना पाहायला मिळत आहे. अचानक लाईट गेल्यामुळे आता ग्रामीण रुग्णालयांमध्ये जनरेटरवर सुरु करण्यात आलेले आहेत. आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये अशीच अवस्था पाहायला मिळाली आहे. जनरेट सज्ज ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

  • संपामुळे वाशिम जिल्ह्यातील 43 गावे अंधारात 

    Mahavitaran Strike News : वाशिम जिल्ह्यातील वाशिम,राजगांव आणि अमानी हे 3 वीज उपकेंद्र सकाळ पासून बंद पडल्याने जिल्ह्यातील 43 गांव अंधारात गेले आहेत. विजे अभावी अनेकांना  अडचणींचा सामना करवा लागत आहे. विजेवर चालणारे काम ठप्प झाली आहेत. 

  • ठाण्यात संपाचे पडसाद, रुग्णालयांना व्हेंटिलेशनचा त्रास

    Mahavitaran Strike News : रात्री 12 वाजल्यापासून वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचे पडसाद ठाण्यात उमटायला सुरुवात झाली आहे. शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा ठप्प झाल्याच्या तक्रारी येत आहेत. गेल्या अनेक तासांपासून वीज खंडीत झाल्याने शहरातील दुकानदार, व्यावसायिक, रुग्णलये यांना समस्या निर्माण झाल्या आहेत. खास करुन वीज खंडीत झाल्याने रुग्णालयांना व्हेंटिलेशनचा (Ventilation) त्रास होत असून इस्त्रीचे दुकान, डेअरी व्यावसायिक, झेरॉक्सचे दुकानदार यांना त्रास सहन करावा लागत आहे. 

  • संपामुळे धाराशिव जिल्ह्यात विद्युत पुरवठा विस्कळीत

    Mahavitaran Strike News : संपामुळे धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बत्ती गुल झाली आहे. 10 विद्युत पुरवठा उपकेंद्र बंद असून 100 पेक्षा अधिक गावात वीज खंडीत आहे. वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्रामीण भागाचा विद्युत पुरवठा विस्कळीत झाला आहे.  धाराशिव शहरातील निम्म्या भागाची लाईट सध्या बंद आहे. धाराशिव शहरातील शिवाजी चौक ,सेंट्रल बिल्डिंग, शांतिनिकेतन ,पोस्ट कॉलनी ,रामनगर ,शाहूनगर आणि एमआयडीसी मधील विद्युत पुरवठा सध्या खंडीत आहे. भूम परंडा ,वाशी ,कळंब,धाराशिव व लोहारा तालुक्यातील जवळपास 50 गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हा विद्युत पुरवठा रात्रीपर्यंत सुरळीत झाला नाही तर ही परिस्थिती आणखीन गंभीर होण्याची चिन्ह आहेत.

  • संपकरी कर्मचाऱ्यांना अखेर मेस्मा लावला

    Mahavitaran Strike Latest News  : राज्यभरात अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली आहे. महावितरण कंपनीच्या (MSEB Employee Strike) खासगीकरणाच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. आता वीज कर्मचाऱ्यांना इशारा देऊनही आंदोलन मागे न घेतल्याने राज्य सरकारने मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू  केला आहे.  सरकारने हा कायदा लागू केल्याने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. सरकारच्या इशाऱ्यानंतरही संपकरी कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.

  • नाशिकमधील सीएनजी पंप बंद

    Mahavitaran Strike News : वीजपुरवठा अभावी नाशिकमध्ये शहरात सीएनजी पंप बंद पडले आहेत. त्यामुळे अनेक वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. सीएनजीचा पुरवठा नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. बहुतांशी सीएनजी पंप बंद असून 
    नाशिककरांना सीएनजीसाठी वणवण करावी लागत आहे.

  • राज्यात केवळ 6 हजार मेगावॅट वीजनिर्मिती

    Mahavitaran Strike News : महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यात केवळ 6 हजार मेगावॅट वीजनिर्मितीच सुरु आहे. या संपाचा सर्वाधिक फटका हा  ग्रामीण भागात बसला आहे. औद्योगिक वसाहतीतही काम बंद झाले आहे. दरम्यान, वीज कर्मचाऱ्यांनी न्याय मिळेपर्यंत आंदोलनाचा इशारा देण्याता आला आहे. तर दुसरीकडे संप आजच मिटेल, असा विश्वास महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांनी व्यक्त केला आहे.

  • महावितरणचे कर्मचारी आक्रमक, अदानी गो बॅक....च्या घोषणा

    महावितरण कर्मचा-यांच्या संपामुळे राज्यातले अनेक वीज प्रकल्प बंद पडले आहेत. याचा ग्रामीण भागात मोठा फटका बसला आहे. औद्योगिक वसाहतीतही काम बंद पडले आहे. दरम्यान, राज्यभरातील वीज कर्मचाऱ्यांच्या संपात नागपुरातील वीज कर्मचारी संविधान चौकात एकत्र येऊन सरकरविरोधात घोषणाबाजी केली. अदानी गो बॅक..... वीज उद्योगाचे खासगीकरण बंद करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.

  • नाशिकमध्ये एकलहरा वीज निर्मिती केंद्रावर आंदोलन 

    Mahavitaran Strike News : नाशिकच्या एकलहरा वीज निर्मिती केंद्रावर आंदोलन सुरु आहे. अदानीविरोधात वीज कर्मचारी संपावर गेलेत. संपामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका नाशिकमध्येही बसताना दिसतोय. रात्रीपासून अनेक भागात बत्ती गुल झालीय. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

  • पुणेकरांना मोठा मनस्ताप, मोबाईल चार्ज होत नाही तर गिझर बंद 

    Mahavitaran Strike News : वीज वितरण कर्मचारी संपाचा फटका पुण्यातल्या विविध भागांत बसलेला पाहायला मिळतोय. पुण्यातल्या अनेक भागांमध्ये बत्ती गुल झालीय. धायरी, कात्रज, शिवणे, सन सिटी, वडगाव सिंहगड रोड परिसरात लाईट बंद झालीय.  रात्रीपासूनच वीजपुरवठा खंडीत असल्याचा फटका कामावर जाणाऱ्यांना बसला आहे. मोबाईल चार्ज होत नाहीएत, तर गिझर बंद असल्यानं गॅसवर पाणी तापवण्याची वेळ आलीय. बत्ती गुल असल्याचा मनस्ताप पुणेकरांना सहन करावा लागत आहे.

  • राज्यभर कर्मचारी आक्रमक, मध्य प्रदेश वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना विरोध

    Mahavitaran Strike News : नागपूर, वाशिम, यवतमाळमध्येही वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. नागपुरात मध्य प्रदेश वीज मंडळाचे कर्मचारी कोरडी पॉवर स्टेशनला दाखल होत असताना राज्य वीज कर्मचाऱ्यांनी त्यांना  जोरदार विरोध करताना घोषणाबाजी केली. वाशिम जिल्ह्यातील 600 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. रात्री पासून हा संप सुरू करण्यात आलाय. वाशिमच्या वीज कर्मचा-यांनी  महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करत खासगीकरणाचा विरोध केला. तर यवतमाळमध्ये महावितरण कर्मचा-यांच्या 72 तासांच्या संपाला सुरुवात झाली आहे. अदानी इलेक्ट्रीकल्स कंपनीने विज वितरणासाठी परवानगी मागितल्यानं राज्यभर कर्मचारी आक्रमक झालेत. 

  • पारस महाऔष्णिक वीज केंद्रातील कर्मचारी संपावर 

    Mahavitaran Strike News : अकोला जिल्ह्यातील पारस महाऔष्णिक वीज केंद्रातील कर्मचारी संपावर गेलेत. त्याचा फटका वीज निर्मितीला बसतोय. प्रकल्पातील 250 मेगावॅट क्षमतेचं एक युनिट बंद पडलंय. संपक-यांनी हे युनिट बंद पाडल्याचा दावा करत असले तरी काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे ते बंद असल्याचं प्रकल्प अधिका-यांनी सांगितलंय. या प्रकल्पात 500 मेगावॅट वीज निर्मिती होते. पारस महाऔष्णिक वीज केंद्रातील 560 पैकी 540 कर्मचारी संपात सामील झालेत

  • नागपूर जिल्ह्यातील तीन संच संपामुळे बंद

    Mahavitaran Strike News : वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पॅावर प्लांट येथील तीन संच संपामुळे बंद आहेत. खापरखेडा पॅावर प्लांट येथील युनीट 2, 3 आणि 4 बंद असल्याने विद्युत पुरवठ्यावर याचा परिणाम झालाय.  खापरखेडा पॅावर प्लांट येथील 95 टक्के कर्मचारी संपावर आहेत. संपामुळे खापरखेडा पॅावर प्लांट येथील वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

  • वैजापूर तालुक्यात काही भागात रात्रीपासून वीज गायब

    Mahavitaran Strike News : संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात काही भागात रात्रीपासून वीज नाहीए. तर गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वडगाव, लासुर स्टेशन आणि आजूबाजूच्या परिसरातही रात्रीपासून वीज गेली आहे.. संपामुळे कर्मचारी कामावर नाहीएत, त्यामुळे वीज पुरवठा पुर्ववत झालेला नाही. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारांवर झाला आहे.

  • भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यरात्रीपासून लाईट बंद 

    Mahavitaran Strike News : भंडारा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात काही ठिकाणी मध्यरात्रीपासून तर काही ठिकाणी पहाटेपासून लाईट बंद आहे. लाईट नसल्यानं नागरिकांची सकाळची कामं खोळंबलीत..लाखांदूरमध्ये पहाटेपासून वीजपुरवठा खंडीत आहेत. अदानीविरोधात वीज कर्मचारी संपावर आहेत मात्र त्याचा त्रास नागरिकांना भोगावा लागतोय.

  • पनवेल येथील इंडिया बुल्स परिसरात वीज पुरवठा खंडीत

    Mahavitaran Strike News : नवी मुंबई जवळील पनवेल येथील इंडिया बुल्स परिसरात मध्यरात्रीपासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे. इतर भागात वीज पुरवठा सुरळीत आहे. उरण शहर काही भागात पहाटे 5 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे. दरम्यान, नवी मुंबईमध्ये मात्र वीजपुरवठा सुरळीत आहे. तरऔद्योगिक वसाहतीमध्येही वीज पुरवठा सुरळीत आहे.

  • रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात बत्ती गुल

    Mahavitaran Strike News : वीज कर्मचारी संपावर गेल्याचा फटका राज्यातल्या ग्रामीण भागातही बसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात बत्ती गुल झाली आहे. रत्नागिरी शहर वगळता राजपूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, मंडणगड या तालुक्यातील वीज गेली आहे. त्यामुळे अनेक व्यवसायावर याचा परिणाम दिसून येत आहे.

  • संपाचा कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाला फटका

    Mahavitaran Strike News : राज्यातील वीज कर्मचारी संपाचा कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाला फटका बसला आहे. कर्मचाऱ्यांअभावी कोयना प्रकल्पातील 36 मेगावॅटचे एक युनिट बंद आहे. कोयना धरणाच्या पायथा वीज प्रकल्पातील 35 कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत. पोफळी वीजनिर्मिती प्रकल्पातीलही कर्मचारी संपामुळे कामावर आलेले नाहीत. कर्मचारी संपामुळे कोयना प्रकल्पातील वीजनिर्मितीवर मोठा परिणाम होवू शकतो

  • चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वीज निर्मितीला फटका

    Mahavitaran Strike News : वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वीज निर्मितीला फटका बसला आहे. 210 मेगावॅट क्षमतेचं युनिट 4 आणि 500 मेगावॅट क्षमतेचं युनिट 5 पडले बंद, युनिट 4 मध्ये एअर हीटर ची समस्या उदभवली आहे तर युनिट 5 मध्ये कोळशाची राख बाहेर निघण्याच्या प्रक्रियेत बिघाड आल्याने दोन्ही युनिट कऱण्यात आले आहेत. चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्रातील 2500 कर्मचारी संपात सहभागी झालेत. 
     

  • संपाचा ग्रामीण भागातही मोठा फटका

    Mahavitaran Strike News : वीज कर्मचारी संपावर गेल्याचा फटका राज्यातल्या ग्रामीण भागातही बसत आहे. साताऱ्याच्या ग्रामीण भागातही बत्ती गुल झाली आहे. आधीच ग्रामीण भागात लोडशेडिंगचं संकट असतं. त्यात आता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचारीच उपलब्ध नाहीत. तसंच वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यास तो पुर्ववत करणार नसल्याचं पत्रकही संपकरी वीज कर्मचा-यांनी काढलंय. तेव्हा ग्रामीण भागातला वीजपुरवठा कधी पुर्ववत होणार हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.

  • खासगीकरणाला तीव्र विरोध, चर्चा फिस्कटल्याने 72 तासाचा संप अटळ

    Mahavitaran Strike News : महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या हालचालींविरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला आहे. अदानी कंपनीला वीज वितरण परवानगी मिळाली तर कर्मचारी आणि ग्राहकांना खर्चात लोटण्याचा प्रकार असेल त्यामुळे परवानगी देऊ नये, अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे. प्रधान ऊर्जा सचिव आणि तिन्ही कंपन्याचे अध्यक्ष तसेच संघर्ष समितीचे पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा झाली. मात्र ती फिस्कटल्यामुळे 72 तासाचा संप अटळ आहे.

  • पुण्यात अनेक ठिकाणी बत्ती गुल

    Mahavitaran Strike News : वीज वितरण कर्मचारी संपाचा फटका पुण्यातल्या विविध भागांत बसलेला पाहायला मिळतोय. पुण्यातल्या अनेक भागांमध्ये बत्ती गुल झालीय. शिवणे, सन सिटी, वडगाव सिंहगड रोड परिसरात लाईट बंद झालीय. वीज वितरण कर्मचारी संपावर असल्याने रात्रीपासूनच लाईट बंद आहे. तर शहरातही अनेक ठिकाणी कर्मचारी संपावर असल्यानेही वीजपुरवठा खंडीत झालाय.

  • संपाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी बैठक

    Mahavitaran Strike News : राज्यातील महावितरण कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी 1 वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे. महावितरण संपकरी संघटना कर्मचारी तसsच महावितरणचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

  • वीज कर्मचाऱ्यांना सरकारचा इशारा, ... तर मेस्मा लावणार

     Mahavitaran Strike News : राज्यभरातील बत्ती आजपासून गुल होण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारलाय. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिलाय. सरकारच्या इशाऱ्यानंतरही संपावर जाणारच, असा ठाम निर्धार संपकरी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलाय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link