पत्नीला 1 किलो सोन्याचं मंगळसूत्र केलं गिफ्ट, किंमत ऐकूण पोलिसांना बसला धक्का
लग्नाच्या वाढदिवशी एका पतीने आपल्या पत्नीला तब्बल 1 किलोचं सोन्याचं मंगळसूत्र गिफ्ट केलं. यादरम्यान त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला.
भिवंडी : लग्नाच्या वाढदिवशी अनेक जण आपल्या पत्नीला किंवा पतीला काही खास गिफ्ट देऊन खूश करतात. पण काही गिफ्ट असे असतात जे चर्चेचा विषय बनतात. सध्या अशाच एका गिफ्टची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. कारण पतीने आपल्या पत्नीला एक किलोचं सोन्याचं मंगळसूत्र गिफ्ट केलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि थेट घरी पोहोचले पोलीस.
आता पोलीस घरी पोहोचल्यानंतर यामध्ये आणखी एक ट्विस्ट आला. व्हिडिओमध्ये पती आपल्या पत्नीसाठी गाणं म्हणतोय. पत्नी देखील हे महागडं गिफ्ट पाहून खूश दिसतेय. पण जेव्हा पोलिसांनी या हार संरक्षण कसं करणार असं विचारलं. तेव्हा पतीने दिलेलं उत्तर ऐकूण पोलीसही हैराण झाले.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस यांच्या घरी पोहोचले. कारण व्हिडिओ व्हायरल झाल्याने यामुळे या मंगळसुत्राचं हे कुटुंब संरक्षण कसं करणार हा प्रश्न पोलिसांपुढे होता. मात्र चौकशीदरम्यान हे एक किलोचं मंगळसूत्र फक्त 38 हजारांना विकत घेतल्याचं त्यांनी सांगितलं. हे मंगळसूत्र खोटं असल्याचं त्यांनी सांगितलं. एका सोनाराकडून त्यांनी हे बनवून घेतलं होतं. त्यानंतर पोलिसांनी सोनाराच्या दुकानात जाऊन चौकशी केली असता मंगळसूत्र खोटं असल्याचं त्यांनीही सांगितलं.
पण अशाप्रकारे व्हिडिओ व्हायरल करुन चोरांना आमंत्रण देऊन जीव धोक्यात घालू नका असं आवाहन देखील पोलिसांनी या वेळी केलं.