या तरूणाचं यश एवढं सोपं अजिबातच नाही...
यंदाचा आरोग्य विद्यापिठाचा सोहळा, अविस्मरणीय ठरला तो, यशस्वी विद्यार्थ्यांच्या विक्रमी यशामुळे.
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : यंदाचा आरोग्य विद्यापिठाचा सोहळा, अविस्मरणीय ठरला तो, यशस्वी विद्यार्थ्यांच्या विक्रमी यशामुळे...पालघर जिल्ह्यातल्या तलासरीसारख्या खेड्यातून पुढे आलेल्या एका विद्यार्थ्यानं एमबीबीएसच्या अभ्यास क्रमात तब्बल १४ सुवर्णपदकं मिळवून सोहळ्याला नवी झळाळी दिली.
तलासरीचं नाव उज्ज्वल केलं
सुलतान मोईऊद्दीन शौकत अलीच्या गळ्यातल्या सुवर्णपदकांनी त्याची मान वाकली असली, तरी त्याच्या आई-वडिलांची मान मात्र उंचावली आहे. पालघर जिल्ह्यातल्या तलासरीसारख्या खेड्यात वाढलेला सुलतान वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात यंदा चर्चेचा विषय बनला आहे.
तब्बल १४ सुवर्णपदकं मिळवली
सुलतानानं एमबीबीएसच्या अभ्यासक्रम कालावधीत तब्बल १४ सुवर्णपदकं मिळवली आहेत. नाशिकच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात शिकताना सुलतान यंदाचा सर्वात यशस्वी डॉक्टर ठरलाय. यशाचं श्रेय सुलतान कुटुंबीय आणि महाविद्यालयातून कठोर मेहनतीला मिळालेल्या प्रोत्साहनाला देतो.
आनंद गगनात मावेना
सुलतानच्या यशानं त्याच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावत नाही. केलेल्या कष्टाचं, खर्चचं मुलानं चीज केलं असं त्याचे पालक सांगतात.
हुशारीला कोणत्याच मर्यादा नसता
आरोग्य शिक्षणात सर्वसामान्य मुलांना प्रवेश मिळणे खूपच अवघड बनले आहे. जीवघेण्या स्पर्धेतून प्रवेश मिळवल्यावर कठोर मेहनतीनं काय साधता येतं. हे सुलतानच्या यशानं सिद्ध होतं. शिवाय हुशारीला स्थळ काळाच्या मर्यादा नसतात . हे ही या निमित्तानं अधोरेखित झालं आहे.