त्या शेतकऱ्याच्या खात्यात १५ लाख आले, तो म्हणाला मोदीजी धन्यवाद.. पण पुढे जे झालं..
पैठण येथील एका शेतकऱ्याच्या खात्यात असेच १५ लाख रुपये जमा झाले. ही रक्कम जमा होताच त्या शेतकऱ्याला पंतप्रधानांची घोषणा आठवली. काळ्या पैशातील आपला हिस्सा जनधन खात्यात जमा झाले असतील, असे समजून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला... पण...
विशाल करोळे, झी २४ तास, पैठण : देशात असलेला काळा पैसा बाहेर काढला तर प्रत्येक नागरिकांच्या खात्यात किमान १५ लाख रुपये जमा होतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. मात्र, विरोधकांनी त्याचा विपर्यास केला. त्याचा इतका गहजब झाला की आपल्या खात्यात १५ लाख रुपये जमा होणार अशीच भावना सर्वसामान्यांची झाली होती.
पैठण येथील एका शेतकऱ्याच्या खात्यात असेच १५ लाख रुपये जमा झाले. ही रक्कम जमा होताच त्या शेतकऱ्याला पंतप्रधानांची घोषणा आठवली. काळ्या पैशातील आपला हिस्सा जनधन खात्यात जमा झाले असतील, असे समजून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.
शेतकऱ्याने आनंदाच्या भरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले. जनधन खात्यावर पंधरा लाख रुपये जमा केल्याबद्दल त्या शेतकऱ्याने थेट पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून आभार व्यक्त करणारे पत्रही पाठविले. मात्र, त्याचा हा आनंद काही काळच टिकला.
पैठणच्या दावरवाडीचे ज्ञानेश्वर जनार्दन औटे या शेतकऱ्याच्या खात्यात 17 ऑगस्ट 2021 रोजी तब्बल 15 लाख 34 हजार 624 रुपये एवढी रक्कम जमा झाली. त्याचा मोबाईलवर संदेश आला. त्यांनी बँकेत जाऊन पासबूकवर रितसर नोंदही केली.
जनधन खात्यावर आपला हिस्सा जमा झाल्याचे पाहून त्यांना आनंद झाला. चांगले घर नसल्याने या रकमेतून चांगले घर बांधावे म्हणून त्यांनी घराचे काम सुरु केले. त्यासाठी खात्यातील नऊ लाख रुपये काढले आणि आपलं स्वप्न पूर्ण केलं.
स्वतःचे पक्के घर झाल्याने ज्ञानेश्वर औटे खूपच आनंदात होते. पाच महिन्यांनी त्यांच्या घरी एक पत्र आलं. ते पाहून त्यांना धक्काच बसला. या पत्रात औटे यांच्या खात्यातील रक्कम ''होल्ड'' केली आहे. तसेच ही रक्कम पिंपळवाडी ग्रामपंचायतीची असून ती चुकून त्यांच्या खात्यात पडल्याचं लिहिलं होतं.
औटे यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम त्यांनी बँकेला परत करावी अशी या पत्रात म्हटलं होतं. हे पत्र पाहून औटे यांच्या छातीत धस्स झालं. जी रक्कम आली होती ती आपलीच समजून घर बांधलेलं. पैसे कारच झाले होते. त्यामुळे इतकी मोठी रक्कम आणायची कुठून असा प्रश्न त्यांना पडला.
या शेतकऱ्याकडे दोन एकर कोरडवाहू शेती आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते आपली उपजीविका भागवितात. मात्र, चुकून आलेली ही रक्कम भरण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी बँकेकडे काही वेळ मागितला आहे.
''माझ्या खात्यात आलेली रक्कम परत करणार आहे. मात्र, सध्या नापिकीमुळे रक्कम भरू शकत नाही." असे ज्ञानेश्वर जनार्दन औटे सांगतात. तर, या प्रकरणात शेतकऱ्यांची चुकी नाही. त्यामुळे बँकेने त्यास गृहकर्ज देऊन सदर रक्कम हप्त्याने जमा करून घ्यावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते करताहेत.