साखर कारखान्याच्या अध्यक्षाचा १६ कोटींचा घोटाळा
त्रिधरा साखर कारखान्याच्या अध्यक्षाने जवळपास ४२० लोकांना फसवून १६ कोटीच्या आसपास कर्ज उचलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
औरंगाबाद : परभणी जिल्ह्यात आमडापूर या गावी त्रिधरा साखर कारखाना आहे, या कारखान्याच्या अध्यक्षाने जवळपास ४२० लोकांना फसवून १६ कोटीच्या आसपास कर्ज उचलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फसवणूक झालेले सर्व शेतकरी आणि शेतमजूर आहेत.
जिंतूर तालुक्यातला साईनगर तांडा. इथल्या ग्रामस्थांची सध्या झोप उडालीय. रोज शंभर रुपये कमावण्याचीही सोय नसणाऱ्या या मजुरांच्या नावावर तीन तीन लाख रुपयांचं कर्ज घेण्यात आले आहे. तहसीन अहमद खान हा परभणीच्या त्रिधरा साखर कारखान्याचा अध्यक्ष असताना २०१३ साली त्याने हा प्रताप केलाय.
मराठवाड्यातील आठही जिल्हे शिवाय नगर आणि वाशीमच्या शेतकऱ्यांच्या नावावर त्याने लाखोंची कर्ज उचललीत. २०१३ पूर्वी वनरक्षक असणाऱ्या तहसीनने त्रिधरा कारखाना चालवायला घेतल्यावर नोकरी सोडली. त्याची पत्नी असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान त्यावेळी या भागाच्या पालकमंत्री होत्या. शेतकऱ्यांच्या जुन्या ओळखीचा फायदा घेत, त्यांना वेगवेगळी अमिषे दाखवत त्यांच्या नावावर कर्ज उचलण्यात आली.
विशेष म्हणजे गावचे सरपंच, शिक्षक, मजूर कुणीच यातून सुटलेले नाही.
दरम्यान, कर्जाचा बोजा पाहून साईनगर तांड्याच्या शांताबाई जाधव तर गेली कित्येक दिवस झोपल्याच नाहीत. धक्कादायक म्हणजे हे तीन लाखांचे कर्ज प्रत्येक कर्जदाराच्या बँक खात्यावर जमा झाले आणि दिवसभरात हे सगळे पैसै त्रिधरा साखर कारखान्याच्या खात्यावर वळते सुद्धा झाले. या सगळ्याबाबत गुन्हे दाखल करून चौकशी केल्याशिवाय यातील सत्य बाहेर येणार नाही, अशी मागणी होत आहे.