शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : उष्णता आणि दुष्काळाची तीव्र झळ माणसांसह आता पशु-पक्षांना देखील बसू लागले आहेत. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात पशु-पक्षांचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. देवणी तालुक्यातील बारोळ गावातील मंदिर परिसरात कावळ्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे. याठिकाणी जवळपास २० हून अधिक कावळे मृतावस्थेत पडल्याचे दिसून आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंदिर परिसरात आणि गावात नेहमीच झाडावर कावळ्यांचे थवे बसत असत. मात्र यंदाच्या दुष्काळात कावळ्यांचे हे थवे पूर्वीपेक्षा कमी संख्येने दिसत आहेत. त्यात आता हे कावळे पाण्याअभावी तडफडून मृत्युमुखी पडत असल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मंदिर परिसर आणि गावात अनेक ठिकाणी हे कावळे मरून पडले आहेत. कावळे तडफडत असताना ग्रामस्थांनी अनेक कावळ्यांना पाणी पाजल्यामुळे त्यांचा जीव वाचल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. 


दरम्यान या घटनेनंतर वनविभागाने लक्ष घालून प्राणी आणि पक्षांच्या पाण्याची सोय करण्याची मागणी बोरोळ येथील ग्रामस्थ करीत आहेत.