दहावीच्या निकालात `लातूर पॅटर्न`चं कमबॅक
१०० टक्के गुण मिळवणाऱ्या २० विद्यार्थ्यांपैकी १६ विद्यार्थी लातूरचे
शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : यंदाच्या दहावीच्या निकालात १०० टक्के गुण मिळवलेले एकूण २० विद्यार्थी आहेत. यात औरंगाबादचे ३ विद्यार्थी, अमरावतीचा एक विद्यार्थी तर १६ विद्यार्थी हे लातूरचे आहेत. दहावीच्या लागलेल्या निकालात लातूर पॅटर्नचा पुन्हा एकदा दबदबा दिसून आला आहे. निकालाच्या टक्केवारीत कोकण विभागाचा दबदबा दिसत असला तरी पुन्हा एकदा लातूर आपल्या पॅटर्नमुळे अधोरेखित झाला आहे. राज्यात २० विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. ज्यात १६ विद्यार्थी हे लातूरचे आहेत.
लातूर शिक्षणासाठी तसेच शिक्षणाच्या अनोख्या लातूर पॅटर्नमुळे सर्व राज्यात परिचित आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून दहावीच्या निकालातून लातूर पॅटर्नची घसरण होत असल्याचे दिसून येत होते. मात्र पुन्हा एकदा या लातूर पॅटर्नने यंदाच्या दहावीच्या निकालात उसळी घेतली आहे. मुळात ९ विभागीय मंडळात लातूर विभागीय मंडळाचा निकाल ७२.८७ टक्के हा ७ व्या स्थानावर आहे. असे असले तरी राज्यात ज्या २० विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण घेतले त्यातले १६ विद्यार्थी हे याच लातूर पॅटर्नचे आहेत. ज्यात लातूरच्या केशवराज विद्यालयातील ६, देशीकेंद्र विद्यालयातील ३ आणि इतर ७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. केशवराज शाळेने केलेल्या अनोख्या तयारीमुळे हे यश मिळाल्याचे हे विद्यार्थी सांगत आहेत. तर पालक विद्यार्थ्यांच्या या यशामुळे आनंदी झाले आहेत.
विद्यार्थ्यांकडून विशेष तयारी, वेगवेगळ्या पद्धतीच्या सराव परीक्षा, शिक्षकांचे मार्गदर्शन, अभ्यासातील सातत्य म्हणजेच लातूर पॅटर्न असून विद्यार्थ्यांकडून संपूर्ण वर्षभरात हे करून घेतले जाते. त्यामुळे १६ विद्यार्थी हे १०० टक्के गुण घेऊ शकले असे केशवराज विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.डी. गवते यांनी सांगितले.
एकूणच दहावीच्या निकालात एकेकाळी गुणवत्ता यादी तसेच राज्यात सर्वप्रथम येणारे विद्यार्थ्यांमुळे लातूर पॅटर्नचा मोठा दबदबा होता. जो गुणवत्ता यादी बंद झाल्यानंतर दिसेनासा झाला होता. मात्र आता १०० टक्के गुण घेणाऱ्या राज्यातील एकूण विद्यार्थ्यांपैकी ८० टक्के म्हणजेच १६ विद्यार्थी लातूरचे असल्यामुळे लातूर पॅटर्नचे यश पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.