COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : धक्कादायक बातमी लातूरमधून...  शासकीय रुग्णालयात एका २० वर्षांच्या बाळंतीणीनं गळफास लावून आत्महत्या केलीय. राधिका चव्हाणचं २७ मे रोजी सिझेरियन झालेलं होतं... त्यानंतर दररोज डॉक्टर बाहेरुन हजार, दीड हजार रुपयांची औषधं आणायला सांगायचे. चव्हाण कुटुंबीयांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती... औषधांचा एवढा खर्च परवडत नव्हता.... आणि सिझेरियनचे टाकेही व्यवस्थित निघाले नसल्यानं रक्तस्राव होऊ लागला. न परवडणारा औषधांचा खर्च आणि असह्य वेदना यामुळे राधिकानं गळफास लावून घेतला. या धक्कादायक घटनेनंतर रुग्णालयातल्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी राधिकाच्या नातेवाईकांनी केलीय. शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा का होता? यासाठी रुग्णालय प्रशासन मात्र काहीही बोलायला तयार नाही. 


गरिबांची क्रूर चेष्टा


औसा तालुक्यातील बुधोडा येथील राधिका सहदेव चव्हाण यांना प्रसूती वेदना झाल्यामुळे डिलिव्हरीसाठी आणण्यात आले. सिझेरियन करून राधिका बाळंतीण झाल्या. गोंडस असा मुलगा झाला. घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र दररोज हजार ते दीड हजारांची औषधे शासकीय रुग्णालयातील प्रसूती विभागातील डॉक्टर बाहेरुन आणण्यास सांगत असत.  ०४ जून येईपर्यंत औषधांचा जवळपास १० हजारांचा खर्च झाला. त्यातच औषधी आणण्यासाठी पतीची होत असलेली विवंचना आणि असह्य वेदनेमुळे राधिका चव्हाण यांनी रुग्णालयातील वार्ड क्र.०४ मधील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. 


मात्र आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे तसेच सिझेरियनचे टाकेही व्यवस्थित न निघाल्यामुळे वेदना असह्य होऊन पत्नी राधिकाने आत्महत्या केल्याचा आरोप पती सहदेव चव्हाणने केलाय... तसेच संबंधित डॉक्टरवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात हा प्रकार घडलाय. गरिबांच्या सेवेसाठी काढलेल्या या रुग्णालयात मात्र गरिबांची कशी क्रूर चेष्टा सुरु आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. 


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयासाठी शासन करोडो रुपयांच्या औषधांची व्यवस्था करीत असतं. मात्र तरीही शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा कसा झाला असा सवाल आता राधिकाचे नातेवाईक विचारत आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अधिष्ठाता, संबंधित डॉक्टर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी पोलिसांकडे केली आहे. 


औषधांचा तुटवडा का?


एकूणच राधिकाच्या आत्महत्येमुळे शासकीय रुग्णालयात औषधांचा काळा-बाजार तर होत नाही ना? करोडो रुपयांच्या औषधांची खरेदी करूनही औषधींचा तुटवडा कसा जाणवला? डॉक्टर आणि अधिष्ठातांच्या वरद हस्तामुळे तर हे सर्व होत नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.


दरम्यान याप्रकरणी शासकीय सर्वोपचार रुग्णालयाच्या संबंधित डॉक्टरांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता डॉक्टरांनी कॅमेऱ्यापुढे बोलण्यास असमर्थता दर्शविली. तर राधिका चव्हाण या बाळंतीण महिलेच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकानी घेतल्यामुळे या प्रकरणाचा गुंता अधिक वाढण्याची शक्यता आहे.