सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : नांदेड जिल्हा परिषद शाळेच्या मध्यान्ह भोजनात पाल पडल्याने 21 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. लोहा तालुक्यात ही घटना आहे. वाळकी बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली होती. या खिचडीत पाल आढळली. ही खिचडी शाळेतील 122 विद्यार्थ्यांनी खाल्ली.  उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले असून, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.


गरीब विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे माध्यन्हभोजन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खिचडी खाल्ल्यानंतर काही वेळाने बहुतांश विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे 21 विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र कापसी बुद्रुक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले असून, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे गरीब विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे माध्यन्हभोजन दिले जात असल्याचे उघडकीस आले आहे. अनेकदा किडे आणि अळ्या लागलेले धान्य वापरुन विद्यार्थ्यांसाठी मध्यान्न भोजन बनवले जाते. 


मध्यान्ह्य भोजनाच्या खिचडीतून 56 विद्यार्थ्यांना विषबाधा 


यापूर्वी देखील नांदेडमध्ये अशी घटना घडली होती. मध्यान्ह्य भोजनासाठी शिजवण्यात येणाऱ्या खिचडीतून 56 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील शाळेत ही घटना घडली होती. खिचडी शिजताना त्यात पाल पडल्याचं समोर आले होते. सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या श्री. छञपती हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्हय् भोजनात खिचडी देण्यात आली होती. मात्र, खिचड़ी खाल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या होत्या. तात्काळ विद्यार्थ्यांना बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते. 


शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या खिचडीत सापसुरळी पडली


शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या खिचडीत सापसुरळी पडली होती. पण स्वयंपाकी महिलेला वेळीच दिसल्याने विषबाधा टळली. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील गारगव्हान इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ही घटना घडली. या शाळेत पत्र्याच्या टिन शेडमध्ये मध्यान्ह भोजन शिजवले जाते. खिचडी शिजवताना त्यात वरुन सापसुरळी पडली. स्वयंपाकी महिलेच्या दिसल्याने ही खचडी फेकून देण्यात आली. काही मुलांनी ही गोष्ट पालकांना सांगितल्याने प्रकार उघड झाला. मध्यान्ह भोजन शिजवल्या जाणाऱ्या ठिकाणी स्वच्छता नसते त्यामुळे ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आहे.